मनसुख यांच्या हत्येच्या पूर्वदिनी वाझेची शर्मासाेबत बैठक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:06 AM2021-04-08T04:06:56+5:302021-04-08T04:06:56+5:30
एनआयएला संशय लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सचिन वाझे हा निवृत्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांचा पूर्वाश्रमीचा सहकारी आहे. ...
एनआयएला संशय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सचिन वाझे हा निवृत्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांचा पूर्वाश्रमीचा सहकारी आहे. क्राइम ब्रँचमध्ये दोघांनी एकत्र काम केले होते. त्यांनी अनेक चकमकींत गुंडांचा खातमा केला होता. निलंबन काळात ते संपर्कात होते. मनसुख यांच्या हत्येपूर्वी ३ मार्चला अंधेरीतील चकाला येथे एक बैठक झाली होती. त्यामध्ये शर्मा उपस्थित होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे त्यामध्ये ते सहभागी होते, असा एनआयएला संशय आहे. याशिवाय वाझेच्या हप्ता वसुलीबाबत त्यांच्याकडे विचारणा करण्यात आल्याचे समजते.
* परमबीर सिंग यांच्याकडे काय झाली विचारणा?
सुमारे चार तासांच्या चौकशीत एनआयएने परमबीर सिंग यांच्याकडे स्फोटक कार, मनसुख हिरेन हत्या आणि सचिन वाझेच्या अनुषंगाने सविस्तर विचारणा केल्याचे समजते. वाझेला पुन्हा सेवेत घेणे, एपीआय असताना सीआययूच्या प्रमुखपदी नेमणे आणि स्फोटक कार प्रकरणासह सर्व महत्त्वाच्या गुन्ह्यांचा तपास त्याच्याकडेच का दिला, त्याबद्दल कोणाच्या सूचना होत्या, याबद्दल त्याचा जबाब नोंदविण्यात आल्याचे समजते.
* कोण आहेत प्रदीप शर्मा?
प्रदीप शर्मा १९८३च्या उपनिरीक्षक बँचचे अधिकारी आहेत. ९०च्या दशकात मुंबई पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरमुळे ते प्रकाशझोतात आले. त्यातील अनेक प्रकरणांमध्ये वादात सापडले. २००८च्या लखन भय्या फेक एन्काउंटरमध्ये त्यांना दोषी ठरवून बडतर्फ करण्यात आले होते. मात्र ‘मॅट’ने त्यांना दोषमुक्त करून सेवेत घेण्याचे आदेश दिले. त्याबाबत उच्च न्यायालयात खटला प्रलंबित असताना साडेतीन वर्षांपूर्वी त्यांना सेवेत घेऊन ठाणे खंडणी विरोधीपथकात नियुक्ती करण्यात आली. परमबीर सिंग त्या वेळी ठाण्याचे आयुक्त होते. त्यानंतर शर्मा यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन २०१९ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर वसईतून विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र त्यात त्यांचा ठाकूर यांच्याकडून मोठ्या मताधिक्याने पराभव झाला होता.
.....................