वाझेचा सीएसटीहून हिरेन यांना साेबत घेऊन प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:07 AM2021-03-26T04:07:22+5:302021-03-26T04:07:22+5:30

घटनेपूर्वीच्या फुटेजमधून स्पष्ट; मर्सिडिज जीपीओजवळ पार्क करून दोघांमध्ये दहा मिनिटे चर्चा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सचिन वाझेबद्दल अनेक ...

Waze's journey from CST with Hiren | वाझेचा सीएसटीहून हिरेन यांना साेबत घेऊन प्रवास

वाझेचा सीएसटीहून हिरेन यांना साेबत घेऊन प्रवास

Next

घटनेपूर्वीच्या फुटेजमधून स्पष्ट; मर्सिडिज जीपीओजवळ पार्क करून दोघांमध्ये दहा मिनिटे चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सचिन वाझेबद्दल अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अँटेलियाजवळ स्फोटक कार ठेवण्याच्या आठवड्याभरापूर्वी वाझेने हिरेन यांना आपल्यासोबत घेऊन मर्सिडीजमधून प्रवास केल्याचे स्पष्ट झाले आहे. सीएसएमटी परिसरातील त्याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहेत. हिरेन यांना ताे का भेटला, काय चर्चा केली आणि ते दाेघे कोठे गेले हाेते, या कारणांचा शोध घेण्यात येत असल्याचे एनआयएच्या सूत्रांनी सांगितले.

२५ फेब्रुवारीला जिलेटीनच्या कांड्या पार्क केलेले स्काॅर्पिओ प्रकरण उघडकीस येण्यापूर्वी म्हणजे १७ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात हिरेन आणि वाझे यांची भेट झाली होती. तेथील चौकातील सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात ही बाब कैद झाली. काळ्या रंगाची मर्सिडिज क्रॉफर्ड मार्केटच्या दिशेला सिग्नलवर थांबली असताना हिरेन हे स्टेशनच्या बाजूने तेथे चालत येऊन मर्सिडिजमध्ये बसले. वाझे गाडी चालवित होता तेथून यू टर्न घेऊन ही गाडी जीपीओजवळ पार्क करून दोघांमध्ये दहा मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर ते निघून जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे समोर आले. त्यामुळेच या दाेघांमधील भेटीमागील कारणांचा शोध घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

* हत्येवेळी सचिन वाझेही हजर

मनसुख हिरेन यांना कळवा खाडीच्या भागात आणल्यानंतर क्लोरोफार्मचा रुमाल त्यांच्या नाका-तोंडाजवळ जबरदस्तीने लावण्यात आला. त्यामुळे झालेल्या या झटापटीत मनसुख यांच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या. त्यानंतर मनसुख यांना ठार मारून खाडीच्या पाण्यात टाकण्यात आले. यावेळी एकाने क्लोरोफार्म आणले होते. मनसुख यांनी प्रतिकार केल्यास त्यांना हाताळण्यासाठी इतर दोघे त्या ठिकाणी होते. वाझेही त्या ठिकाणी जवळच उभे असल्याचे मुंबई पाेलीस दलातून निलंबित करण्यात आलेला पाेलीस काॅन्स्टेबल विनायक शिंदे याने जबाबात सांगितल्याचे एटीएसच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

Web Title: Waze's journey from CST with Hiren

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.