* ‘त्या’ महिलेकडून आर्थिक गुंतवणूक; एनआयएच्या चाैकशीतून माहिती उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मीरा रोड येथील मीना जॉर्ज या महिलेच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केलेल्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्फोटक कारप्रकरणी अटकेतील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेकडे वसुलीतून दरमहा जमा होणारी लाखोंची रक्कम मीना जॉर्ज ही महिला सांभाळत होती, त्यातील त्याच्या हिश्श्यातील काही रक्कम हवाल्याच्या माध्यमातून आखाती देशात पाठविल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तिचा स्फोटक कार व मनसुख हिरेनच्या हत्येत सहभाग आहे का, याची माहिती घेतली जात आहे.
वाझे हा हॉटेल ट्रायडंटमध्ये वास्तव्याला असताना त्याला भेटण्यासाठी वारंवार एक महिला आल्याचे तेथील हॉटेल व्यवस्थापनातील चौकशी व सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणीतून स्पष्ट झाले होते. तपासानंतर संबंधित महिला मीरा रोडच्या सेवन इलेव्हन कॉम्प्लेक्समध्ये सी विंगमधील रूम नंबर ४०१ मध्ये राहत असल्याचे समाेर आले. गेल्या काही दिवसांपासून हा फ्लॅट बंद होता. मूळची गुजरातची असलेली ही महिला गुरुवारी परतल्यानंतर एनआयएने तिच्याकडे चौकशी सुरू केली.
सुमारे १३ तास तिची चाैकशी केल्यानंतर पथकाने तिला ताब्यात घेऊन मुंबईतील कार्यालयात आणले होते. रात्री उशिरा तिला सोडल्यानंतर शनिवारी पुन्हा चौकशीसाठी बाेलावले. मुंबईतील विविध बार, लॉजेस, पार्लर व अन्य ठिकाणाहून जमा झालेल्या रकमेतील वाझेचा ‘वाटा’ मीना हाताळत होती. त्याच्या सांगण्यावरून तिने काही रक्कम गुंतवणूक करण्याबरोबरच हवाल्याच्या माध्यमातून आखाती देशात पाठविल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आहे. तिच्या चौकशीतून अनेक बाबी समोर येत आहेत. अंबानींच्या निवासस्थानाच्या परिसरात जिलेटिनच्या कांड्या असलेली स्काॅर्पिओ ठेवणे आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येमध्ये तिचा काही सहभाग आहे का, तिला या गुन्ह्याची माहिती होती का, याबाबत माहिती घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
................