दिल्लीकडून वजीर ‘चेकमेट’
By admin | Published: July 29, 2014 01:13 AM2014-07-29T01:13:54+5:302014-07-29T01:13:54+5:30
बुद्धिबळाच्या पटावर वजीर हा कोणत्याही क्षणाला सामन्यात थरार निर्माण करून कलाटणी देऊ शकतो
स्वदेश घाणेकर, मुंबई
बुद्धिबळाच्या पटावर वजीर हा कोणत्याही क्षणाला सामन्यात थरार निर्माण करून कलाटणी देऊ शकतो, तसाच पुणेरी पलटन संघाचा कर्णधार वझीर सिंह हाच आज खिंड लढवत होता. प्रो कबड्डीच्या तिसऱ्या दिवशी प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात पुणेरी पलटन आणि दबंग दिल्ली हे दोन तगडे संघ आमनेसामने आले खरे, परंतु पुण्याकडून केवळ वजीर सिंहच खेळताना जाणवला. इतरांना सातत्याने आलेल्या अपयशाचा फायदा उचलत दबंग दिल्लीने ‘वजीर’चा डावाला ‘चेकमेट’ करून सामना ३५-३१ असा जिंकला आणि गुणतालिकेत पाच गुणांसह तिसरे स्थान पटकावले.
पहिल्याच मिनिटाला दिल्लीच्या सुरजीत नरवाल याने दोन चढाईत पुण्याच्या दोघांना टिपून दिल्लीचे खाते उघडले. ११व्या मिनिटाला काशिलिंग आडकेने यात आणखी भर टाकत एकाच चढाईत तिन खेळाडूंना बाद करून दिल्लीला ६-१ अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. हे कमी होते की काय तिसऱ्याच मिनिटाला दिल्लीने पुण्यावर लोण चढवून आघाडी ९-१ अशी मजबूत केली. सुरुवातीला दिल्लीच्या दंबगगिरीसमोर पुणेरी पलटन हतबल झालेली पाहायला मिळाली. पुण्याकडून कर्णधार वजीर वारंवार चढाया करून बरोबरी साधत होता.