मुंबई : राज्याच्या विकासात कामगार महत्त्वाचा वाटा देत असतात. त्यामुळे राज्यातील संघटित आणि असंघटित क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कामगारांच्या हक्कांचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. कामगार आयुक्तालय येथे कामगार आयुक्तालय स्थापनेच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून आयुक्तालयामार्फत तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचे गुरुवारी हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले; त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद - सिंघल, कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, कामगार सहआयुक्त शिरीन लोखंडे उपस्थित होते.
हसन मुश्रीफ म्हणाले की, ब्रिटीशकालीन काळात कामगारांच्या हक्कासाठी अनेक कायदे अमलात आणले गेले. भारताच्या निर्मितीत कामगारांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. आगामी काळात कामगार विभागामार्फत कामगारांच्या हिताला प्राधान्य देण्यात येईल. कामगार आयुक्तालय १९२१मध्ये स्थापन करण्यात आले होते. यावर्षी म्हणजे २०२१ साली याचे शताब्दी वर्ष आहे. याच निमित्ताने कामगार आयुक्तालयामार्फत बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे. यावेळी बालकामगार म्हणून काम करत असलेल्या ७ मुलांनी बालकामगारी सोडून देत पुन्हा एकदा शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केल्याबद्दल या मुलांचा गौरव करण्यात आला.
फोटो ओळ : कामगार आयुक्तालय स्थापनेच्या शताब्दी वर्षानिमित्त आयुक्तालयामार्फत तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचे गुरुवारी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद - सिंघल, कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर उपस्थित होते.