मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन मी निवृत्त होणार असल्याची मोठी घोषणा आज पवार यांनी केली. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये 'लोक माझा सांगाती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ही घोषणा केली, या निर्णयावरुन आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही ट्विट करुन प्रतिक्रिया दिली.
शरद पवारांची निवृत्ती; आता राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार? ४ नेत्यांची नावे आघाडीवर!
माननीय शरद पवार साहेब आपण राजकारणातही हवेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदीसुद्धा हवेत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे.
'शरद पवारांची मोठी घोषणा'
शरद पवार म्हणाले, १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तेव्हापासून गेली २४ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सार्वजनीक जीवनातील १ मे १९६० पासून सुरू झालेला हा संपूर्ण प्रवास गेली ६३ वर्ष अविरत सुरू आहे. यातील ५६ वर्ष मी कुठल्या ना कुठल्या सभागृहात सदस्य म्हणून काम केलं आहे. राज्यसभेची पुढची तीन वर्ष राहिली आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या अधिकाधीक प्रश्नांवर लक्ष घालण्यावर माझा भर असेल, असंही शरद पवार म्हणाले.
आपल्याला माहिती आहे, माझा अनेक संस्थांशी कामकाजामध्ये सहभाग आहे. रयत शिक्षण संस्था (सातारा), विद्या प्रतिष्ठान (बारामती), मराठा मंदीर मुंबई, महात्मा गांधी सर्वादय संघ, अशा अनेक संस्थांच्या कामकाजामध्ये माझा सहभाग आहे, या कार्यांवर मी अधिक भर देणार आहे, असंही शरद पवार म्हणाले.