Join us

'एमआयएम असणारच, औवेसींना सोडून काँग्रेसशी आघाडी अशक्य'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2018 10:10 AM

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबतच्या आघाडीबाबत पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबई - भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबतच्या आघाडीबाबत पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या 3 लोकसभा निवडणुकांचा अभ्यास केल्यास, काँग्रेस 22 जागांवर पराभूत होत आहे. त्यामुळे आम्ही त्या 22 जागांपैकी 12 जागा आम्हाला देण्याची मागणी काँग्रेसकडे केली आहे. जर, काँग्रेसने 12 जागा आम्हाला दिल्या, तर आम्ही काँग्रेससोबत आघाडी करू, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. मात्र, काँग्रेससोबत आघाडी करताना एमआयएम आमच्यासोबत असणारच हेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांत जागावाटपाच्या बैठका सुरू झाल्या आहेत. तर आघाडी आणि युतीबाबतही चर्चा रंगत आहे. भारिप बहुजन महासंघाने असुदुद्दीन औवेसी यांच्या एमआयएम पक्षाशी हातमिळवणी केली आहे. तर, काँग्रेससोबत जायची आमची तयारी आहे, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे. एका खासगी वृत्तपोर्टलसाठी मुलाखत देताना आंबेडकर यांनी कुठल्याही परिस्थीतीत एमआयमला सोडणार नसल्याचे म्हटले आहे. आम्ही काँग्रेससोबत जाऊ पण एमआयएम आमच्यासोबत असेल, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. सध्या, राज्यातील काँग्रेस नेत्यांशी आमची चर्चा सुरू आहे. आम्ही काँग्रेसकडे 12 जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, अद्याप काँग्रेसकडून कुठलेही ठोस आश्वासन आले नसल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :प्रकाश आंबेडकरऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनकाँग्रेस