अतुल कुलकर्णीमुंबई : अनेक संकटांवर यशस्वी मात करत महाविकास आघाडी सरकाने एक वर्षाचा कालावधी पूर्ण केला. त्यामुळे सरकार पाडण्यासाठी देव पाण्यात ठेऊन बसलेल्या विरोधकांच्या पोटात दुखतंय. ज्यांच्यासोबत २५ वर्षे काढली त्यांनीच विश्वासघात केला. पण विश्वासघात आमच्या रक्तात नसल्याने तीन पक्षांचं सरकार व्यवस्थित चाललंय, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘लोकमत’शी बोलताना ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. तसेच सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखाही मांडला. भाजपने दिलेला शब्द पाळला नाही. म्हणून, नवे समीकरण जुळून आले. मुंबई महापालिकेतही आमची आघाडी कायम असेल, असेही त्यांनी सांगितले.
भाजपबद्दल आपल्या मनात एवढा राग का आहे? २५ वर्षे आम्ही काय भोगले आम्हाला माहिती आहे. आमच्या मित्राच्या मनात पाप होते. त्यांचे मन किती काळे होते, हे या वर्षात समोर आले. आम्ही कधी कुटुंबावर आरोप केले नाहीत, पण त्यांनी ते देखील केले. भाजप आता उपऱ्यांच्या सल्ल्याने चालला आहे.
भाजपने मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली तर?आता ती वेळ निघून गेली आहे. अशा जर-तरला काही अर्थ नाही. दिवस सगळयांचे सारखे नसतात. काळ बरोबर निर्णय घेत असतो. आता त्या बोलण्याला काही अर्थ नाही.
तुम्ही शरद पवार यांच्या सल्ल्याने वागता अशी टीका होते.
शरद पवार आणि आमच्या परिवाराचे संबंध बाळासाहेब असल्यापासून आहेत. ते जेव्हा येतात तेव्हा मी काही पाटी पेन्सील घेऊन अभ्यासाला बसल्यासारखा बसत नाही. ते अनुभवाचे बोल सांगतात. त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या घटनांमध्ये त्यांनी काय केले होते हे सांगतात. या स्थितीत काय केले पाहिजे हे सांगतात. त्यामुळे त्याचा फायदाच होतो.
सरकारच्या वर्षपूर्तीकडे कसे बघता?आमचे सरकार दोन महिनेसुध्दा चालणार नाही असे म्हणणाºयांना योग्य ते उत्तर मिळाले आहे. मी अनपेक्षितपणे ही जबाबदारी स्वीकारली. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्टÑवादीचे नेते शरद पवार यांचे सहकार्य आहे. तसेच बाळासाहेब थोरात, अजित पवार, अशोक चव्हाण, जयंत पाटील यांनी उत्तम संवाद ठेवला आहे. या वर्षभरात आम्ही कोविड रुग्णांसाठी लाखांच्यावर बेड बनवू शकलो. कोरोना तपासणीची दोन ठिकाणं राज्यात होती, आज आपल्याकडे ४५० तपासणी केंद्र सुरु आहेत. देशातले सर्वात मोठे कोविड हॉस्पीटल मुंबईत १७ दिवसांत उभे केले. शेतकºयांना कर्जमाफी दिली. नैसर्गिक संकटावर मात करताना पॅकेज दिले. हजारो कोटींचे
दिल्लीच्या राजकारणात जाण्याची इच्छा आहे का?आज तरी माझा तसा कोणता विचार नाही. मी दिवसाढवळ्या अशी स्वप्न पहात नाही. ‘मी पुन्हा येईन!’ असेही मी कधी म्हणत नाही. न म्हणताच मी इथे देखील आलोय. काम करणे हा माझा स्वभाव आहे. जे आवाक्यात आहे तेच करावे व आपली वाटचाल चालू ठेवण्यावर माझा विश्वास आहे.