सध्याच्या स्थितीत नाट्यसृष्टीला उर्जितावस्था आणण्यासाठी काय करता येईल?मार्च महिन्यात आपण ज्या परफेक्शनने नाटक सादर केले, त्याच परफेक्शनने आताही ते सादर करणे गरजेचे आहे. व्यवस्थित तालमी करून जे त्या वेळी केले होते, तेच आताही करायचे आहे. थोडक्यात, क्वालिटी राखणे आवश्यक आहे आणि ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मग त्यासाठी नाटकाचे सेट, कपडे, संगीत या सर्वांची रंगीत तालीम जशी आम्ही नवीन नाटकाच्या आधी करत होतो, तशीच आता करावी लागेल. मी ९ ते ११ डिसेंबर या काळात माझ्या नाटकांची तालीम करतोय; कारण १२ तारखेला ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या माझ्या नाटकाचा पुण्यात प्रयोग करतोय. तसेच माझे दुसरे जे नाटक आहे, ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाचा प्रयोग १२ तारखेलाच कल्याणमध्ये करतोय. रंगीत तालमीनंतर फ्रेश मूडमध्ये आम्ही आमचे प्रयोग खणखणीतपणे सादर करू.नजीकच्या काळात नाट्यसृष्टीचे चित्र कसे असेल?नजीकच्या काळातील नाट्यसृष्टी कशी असेल, हे आताच सांगणे अवघड आहे. पण आम्ही आमचे काम चोख करतोय आणि रसिकांनीही जे नियम आखून दिले आहेत, ते तंतोतंत पाळूनच नाटकाला यावे. एकदा रसिक नाट्यगृहात आसनस्थ झाले की त्यांचे मनोरंजन करणे ही आमची जबाबदारी आहे. नाट्यगृहात येईपर्यंत रसिकांनी त्यांची काळजी घ्यावी, कारण नाट्यगृहात आल्यावर सर्व तपासणी करूनच नाट्यगृहात प्रवेश दिला जाईल. पण, एकदा का रसिक नाट्यगृहात स्थानापन्न झाले की रसिकजन आणि आम्ही धमाल करू शकतो.नाट्यरसिकांवर नक्की कोणती जबाबदारी असेल?नाटक सुरू होण्याआधी किमान पाऊण तास तरी आधी रसिकांनी नाट्यगृहावर यावे, अशी माझी विनंती आहे. कारण सॅनिटायझेशन, तापमान, ऑक्सिजन वगैरे सोपस्कार आपल्याला पार पाडायचे आहेत. हे सर्व केल्याशिवाय नाट्यगृहात ‘एन्ट्री’ नाही. रसिक जर यासाठी लवकर आले तर प्रयोग वेळेवर सुरू करता येईल. इंटरव्हलमध्ये वावरताना इतरांशी दोन-तीन फुटांचे अंतर असेल याची काळजी घेतली पाहिजे. नाटक संपल्यावर सर्वात शेवटची जी रांग आहे त्यांना आधी बाहेर जाऊ द्या. मग त्यापुढची एक एक रांग, असे असावे. एकदम सर्वांनी गर्दी करून बाहेर जाऊ नका. या बेसिक गोष्टी सर्वांनी पाळल्या पाहिजेत. आम्ही आमचे काम चोख करू, रसिकांनी त्यांची जबाबदारी ओळखायला हवी.५० टक्के क्षमतेमुळे कोणता फरक पडेल?पूर्वी आम्ही आठवड्यातल्या कोणत्याही दिवशी प्रयोग करायचो, पण सध्या एकंदर काय परिस्थिती आहे याचा अंदाज घेण्यासाठी आम्ही वीकेण्डला प्रयोग करणार आहोत. आता ५० टक्के क्षमतेत प्रयोग करायचा असल्याने खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ नीट साधणे गरजेचे आहे. तो एकदा व्यवस्थित साधता आला की आमची पुढची वाटचाल सुरू होईल. निर्माता म्हणून मी माझ्या कलाकारांशी याबाबत आधीच बोलून घेतलेले आहे. पहिल्या फळीतल्या कलाकारांनी ५० टक्के कमी मानधन घ्यावे; दुसऱ्या फळीतल्या कलावंतांनी ३० टक्के कमी मानधन घ्यावे. आमचे बसचे मालक तसेच टेम्पोवाल्यांनीही थोडे पैसे कमी केलेले आहेत.प्रयोगांसाठी काही साहाय्य मिळत आहे का?नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांनी त्यांच्या क्षेत्रातली जी नाट्यगृहे आहेत; त्यांच्या भाड्यात सध्या ७५ टक्के सूट दिलेली आहे. ही आमच्यासाठी आशादायक बाब आहे. टोलच्या प्रश्नावरही मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वृत्तपत्रांनीही त्यांचे दर थोडे कमी केलेले आहेत. आमच्या बाजूने आमची तयारी पूर्ण झाली आहे, आता रसिकांनी त्यांच्या आवडीच्या नाटकांचा नाट्यगृहात येऊन नक्की आस्वाद घ्यावा.मुलाखत : राज चिंचणकर
आम्ही पूर्ण तयारीत... आता रसिकांनीही जबाबदारी ओळखावी..!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2020 3:10 AM