महाराष्ट्रातून जी गोष्ट होते, ती पुढे खूप मोठी होते; आम्ही लोकशाहीसाठी लढणार- के. चंद्रशेखर राव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 05:10 PM2022-02-20T17:10:23+5:302022-02-20T17:11:00+5:30
उद्धव ठाकरे आणि आमचं अनेक विषयावर एकमत असल्याची माहिती के. चंद्रशेखर राव यांनी यावेळी दिली.
मुंबई: विरोधी पक्षांना भारतीय जनता पक्षाविरोधात एकत्र येण्याचं आवाहन केल्यानंतर आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली. के. चंद्रशेखर राव आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. वर्षा निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओककडे रवाना झाले आहेत.
उद्धव ठाकरे यांना भेटून आनंद झाला. उद्धव ठाकरे आणि आमचं अनेक विषयावर एकमत असल्याची माहिती के. चंद्रशेखर राव यांनी यावेळी दिली. तसेच परिवर्तनाच्या मुद्द्यावर आमचं एक मत असल्याचं देखील के. चंद्रशेखर राव यांनी सांगितलं. महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ-भाऊ आहेत. दोन्ही राज्यांमध्ये हजार किलोमीटरचे अंतर असले तरी दोन्ही राज्यात चांगले संबंध आहेत, असं के. चंद्रशेखर राव यांनी सांगितलं.
आम्ही आणखी काही पक्षांच्या नेत्यांसोबत देशातील परिस्थीतवर चर्चा करणार आहे. महाराष्ट्रातून जी गोष्ट होते, ती पुढे खूप मोठी होते. लोकशाहीसाठी आम्ही लढणार आहोत. याची सुरूवात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून सुरू केली आहे, असं के. चंद्रशेखर राव यांनी सांगितलं.
Maharashtra CM Uddhav Thackeray, Telangana CM K Chandrasekhar Rao, and others pose for a photo after the meeting got over, at the former's official residence in Mumbai.
— ANI (@ANI) February 20, 2022
Sanjay Raut, actor Prakash Raj also present. pic.twitter.com/3cf354u8Zt
देशात सुडाचे राजकारण सुरु झाले आहे. आमचे राजकारण तसे नाही. या गोष्टी अशाच सुरु झाल्या तर देशाचं भवितव्य काय? सूडाचं राजकारण करणे ही आमची परंपरा नाही. सूडाचे राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही. देशात परिवर्तन होण्याची गरज आहे. परिवर्तनाच्या मुद्द्यावर आमचे एकमत झाले आहे. देशातील राजकारण विकासकामांवर चर्चा झालीअशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे, के. चंद्रशेखर राव आणि इतरांनी मुंबईतील बैठक संपल्यानंतर फोटोसाठी पोझ दिली. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह अभिनेते प्रकाश राजही उपस्थित होते.
दरम्यान, के. चंद्रशेखर राव यांनी भाजपवर निशाणा साधत भाजपला देशातून हद्दपार करा अन्यथा देश उद्ध्वस्त होईल, असं वक्तव्य केलं आहे. भाजपला सत्तेतून हटवण्यासाठी राजकीय शक्तींनी एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. भाजपच्या विरोधात विविध विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केसीआर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटण्याची योजना आखत असल्याची माहिती समोर आली आहे.