मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी धर्म बदलल्याचा दावा केला आहे; पण मलिक यांचा दावा वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी फेटाळून लावला आहे. यासाठी आपल्या लग्नाचे फोटोच रेडकर यांनी सोशल मीडियात पोस्ट केले.क्रांती रेडकर यांनी सोशल मीडियावर दोन फोटो ट्विट करत समीर वानखेडे यांच्या धर्माबाबत कोणाचेही नाव न घेता खुलासा केला. ‘मी आणि माझे पती समीर जन्मापासून हिंदू आहोत. आम्ही कधीच धर्मांतर केले नाही. आम्ही सर्वच धर्मांचा आदर करतो. समीरचे वडीलही हिंदू आहेत. माझी सासू मुस्लिम होती. आता ती या जगात नाही. समीरचे पहिले लग्न स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत झाले होते. २०१६ मध्ये त्यांचा रीतसर घटस्फोट झाला होता. आमचे लग्न हिंदू विवाह कायद्यानुसार २०१७ मध्ये झाले, असे क्रांती रेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. रेडकर यांनी दोनफोटो ट्विट केले. यातील पहिला फोटो समीर आणि क्रांती यांच्या लग्नाचा आहे. यात दोघे एकमेकांना हार घालत आहेत, तर दुसरा फोटो या लग्न सोहळ्यानंतरचा कुटुंबाचा एकत्रित फोटो आहे.
आम्ही जन्मापासून हिंदू, अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी केले ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 9:32 AM