स्पर्धेला आम्ही घाबरत नाही; योगींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांनी ठणकावले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 03:30 AM2020-12-02T03:30:32+5:302020-12-02T07:28:11+5:30
‘महाराष्ट्र हे मॅग्नेटिक राज्य आहे. उद्योजकांना आजही राज्याचे आकर्षण कायम आहे. राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत तर इतर राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रात उद्योगासाठी येतील’, असा विश्वास व्यक्त केला.
मुंबई : महाराष्ट्रातून कुणी काही घेऊन जाऊ शकत नाही. स्पर्धेला आम्ही घाबरत नाही. कुणी ओढून ताणून येथून काही घेऊन जाणार असेल, तर शक्य होणार नाही. महाराष्ट्रातील उद्योग महाराष्ट्रातच राहतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या राज्यातील गुंतवणुकीसाठी मुंबईत येत असताना आणि गुजरातने परकीय गुंतवणुकीत देशात नंबर वन असल्याचा दावा केला असताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंगळवारी इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत अयोजित कार्यक्रमात, ‘महाराष्ट्र हे मॅग्नेटिक राज्य आहे. उद्योजकांना आजही राज्याचे आकर्षण कायम आहे. राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत तर इतर राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रात उद्योगासाठी येतील’, असा विश्वास व्यक्त केला.
मॅग्नेटिक या शब्दात मोठी ताकद आहे. महाराष्ट्राला एक इतिहास आहे. हे सर्वार्थाने वेगळे राज्य आहे. इथे वेगळे संस्कार आहेत. राज्यात नवीन गुंतवणूक येते आहे. कुठलीही अडचण असेल, तर ती दूर करण्यात सरकार तुमच्या सोबत असते हे तुम्हाला सांगता येईल, असे ते म्हणाले. इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्ससारख्या संस्थेने पुढाकार घेतल्यास शेतकऱ्यांनाही याचा फायदा होईल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
योगींच्या भेटीवर भाजप नेत्यांचे मौन का?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येऊन इथले उद्योग तिकडे नेण्याची भाषा करतात, तरीही भाजप नेते गप्प का, असा सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन बॉलीवूडने उत्तर प्रदेशात यावे असे आवाहन केले. त्यावर चव्हाण म्हणाले, भाजपच्या ५ वर्षाच्या काळात दिवसाढवळ्या महाराष्ट्रातील अनेक उद्योग अन् कार्यालये गुजरातला पळवण्यात आली. त्यावेळीही राज्यातील भाजप नेते गप्प बसले.