मुंबई: अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणासाठीही रेल्वे सेवा सुरु नसल्याने मुंबईतील डबेवाल्यांची मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करा यामागणीसाठी मनसेने काही दिवसांपूर्वी सविनय कायदेभंग आंदोलन केले. या आंदोलनाला मुंबई डबेवाला संघटनेने देखील पाठिंबा दिला. यानंतर डबेवाला संघटनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
मुंबई डबेवाला असोसिएशनच्या शिष्टमंडळाने आपल्या प्रश्नांचे निवेदन राज ठाकरेंना दिले. यामध्ये त्यांनी लोकल सेवा सुरु करावी यासाठी गेल्या महिनाभरापासून मुंबई डबेवाला रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. मुंबई हळूहळू पुर्वपदावर येत आ.हे काही शासकीय, निमशासकीय, कार्पोरेट कार्यालये चालू झाली आहेत. ज्या कार्यालयात शक्य आहे तेथे डबेवाले सायकलवर जेवणाचे डबे पोहचवत आहेत. परंतु जोपर्यंत लोकल सेवा बहाल होत नाही तो पर्यंत डबेवाला आपली सेवा पूर्ण क्षमतेने देऊ शकत नाही. एकतरं डब्बेवाल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या किंवा डब्बेवाल्यांना अत्यावश्यक सेवा कर्मचारी म्हणून रेल्वेने प्रवास करु द्या, अशी आमची मागणी आहे. मात्र या दोन्ही मागण्यांकडे प्रशासानाने दुर्लक्ष केले आहे, अशी तक्रार डबेवाल्यांनी राज ठाकरेंकडे केली आहे.
राज्यातील असंघटित कामगार हा बहुतांशी परप्रांतीय आहे. तरीदेखील महाविकास आघाडीने त्यांना ५ हजार रुपये मदत केली आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो, परंतु मुंबईत राहणारे डबेवाले हे भूमिपुत्र असून त्यांच्याही खात्यावर ५ हजार रुपये जमा करण्यात यावेत, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. विशेष म्हणजे यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा देखील झाली. परंतु अद्याप निर्णय न झाल्याने कोणताही लाभ डबेवाल्यांना मिळाला नाही, असं मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.
इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी आम्हा डबेवाल्यांना शाळांमध्ये येण्याची परवानगी दिलेली नाही. डबेवाल्यांमुळे शाळांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढणार असल्याचे शाळांचे म्हणणे आहे. मात्र ते आम्हाला ते पटलेले नाही. याबाबत देखील आम्ही राज ठाकरेंसोबत चर्चा केली आहे. त्यावर राज ठाकरेंनी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करू, असे आश्वासन दिले असल्याची माहिती संघटनेच्या अध्यक्षांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
सत्ता त्यांच्या हातात द्या अन् प्रश्न माझ्याकडे आणा- राज ठाकरे
एरव्ही शिवसेनेशी जवळीक ठेवणारे डबेवाले भेटायला आल्याने जाता जाता राज ठाकरेंनी डबेवाल्यांना चिमटा काढला, सत्ता त्यांच्या हातात द्या अन् प्रश्न माझ्याकडे आणा असं राज ठाकरेंनी सुनावलं.