Join us

VIDEO- स्वेच्छा मरणासंदर्भात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर मुंबईतील लवाटे दाम्पत्य नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2018 3:36 PM

ऐतिहासिक निर्णयावर स्वेच्छा मरणाची मागणी करणाऱ्या मुंबईतील लवाटे दाम्पत्याने मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई- अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या इच्छामरणाच्या नाजूक मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं आज एक ऐतिहासिक निकाल दिला. सन्मानाने जगण्याच्या घटनादत्त अधिकाराकडे लक्ष वेधून, घटनापीठाने इच्छामरणाला सशर्त मंजुरीच दिली आहे. अर्थात, या निर्णयाचा दुरुपयोग किंवा गैरवापर होऊ नये यादृष्टीने स्पष्ट नियमावली तयार करण्याचे निर्देश सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी दिले. पण सुप्रीम कोर्टाच्या या ऐतिहासिक निर्णयावर स्वेच्छा मरणाची मागणी करणाऱ्या मुंबईतील लवाटे दाम्पत्याने मात्र नाराजी व्यक्त केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आम्ही समाधानी नाही अशी प्रतिक्रिया मुंबईतील लवाटे दाम्पत्याने दिली आहे.

आम्ही दोघेही धडधाकट आहोत. आम्हाला काहीही आजार नाही. पण या वयात आम्हाला कुणावरही अवलंबून राहायचं नाही. आम्ही अवयव दान केलं असून जितक्या लवकर आम्हाला इच्छा मरणाची परवानगी मिळेल तितकं ते आमच्यासाठी फायद्याचं ठरेल. सुप्रीम कोर्टाने आज दिलेला निर्णय आम्हाला पटला नाही असंही लवाटे दाम्पत्याने म्हटलं.  राष्ट्रपतींना आम्ही पुन्हा पत्र पाठवला आहे. तसंच ३१ मार्च पर्यंत आम्ही सरकारला अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे अजून तरी आम्ही काही निर्णय घेतलेला नाही असे इरावती लवाटे यांनी म्हटलं आहे. सरकारने आमच्या मागणीचा योग्य विचार केला नाही, तर आम्हाला आम्ही ठरविल्याप्रमाणे हिंसेचा मार्ग अवलंबवावा लागेल, असं नारायण लवाटे यांनी म्हणत सरकारला एकप्रकारे इशारा दिला आहे. 

 

लवाटे दाम्पत्य दक्षिण मुंबईतील चर्नीरोडजवळच्या ठाकुरद्वारमध्ये राहतं. या दाम्पत्याला मुलं नाहीत तसंच कुठला गंभीर आजारही नाही. वयानुसार समाजासाठी आपला काहीही उपयोग नसून स्वतःचा सांभाळ करण्यासाठी आपण आता सक्षम नाही, असं या दाम्पत्याला वाटतं आहे. नर्स अरूणा शानबाग यांना इच्छामरण मिळावं, यासाठी केईएम हॉस्पिटलने दया याचिका दाखल केली होती. ते वाचून या दाम्पत्याने इच्छामरणाचा विचार केला होता. 

टॅग्स :इच्छामरणसर्वोच्च न्यायालय