मुंबई :पावसाळ्यापूर्वी सुरक्षित स्थलांतर करण्याबाबत 'एस' वॉर्डातील भांडुप आणि विक्रोळी परिसरात डोंगराळ भागातील इमारती आणि झोपड्यांमध्ये राहणाऱ्यांना सावधानतेच्या सूचना - नोटीस आधीच देण्यात आल्या आहेत. तरीही स्थलांतर न करता तेथेच राहणाऱ्या रहिवाशांची जबाबदारी त्यांची स्वत:ची असेल. नैसर्गिक दुर्घटना झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही,असा स्पष्ट इशारा मुंबई महापालिकेच्या 'एस'वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांनी दिला आहे.
विक्रोळी पश्चिम परिसरातील सूर्यानगर, पवई येथील इंदिरानगर, गौतम नगर, पासपोली, जयभीम नगर तसेच भांडूप पश्चिम येथील रमाबाई आंबेडकर नगर भाग १ व २, नरदास नगर, गांवदेवी टेकडी, गावदेवी मार्ग, टेंभीपाडा, रावते कंपाऊंड, खिंडीपाडा, रामनगर, हनुमान नगर, हनुमान टेकडी, अशोक टेकडी, आंब्याची भरणी, डकलाईन मार्ग, नवजीवन सोसायटी, तानाजी वाडी, दर्गा मार्ग, खदान विश्वशांती सोसायटी या ठिकाणच्या टेकडीच्या - डोंगराच्या उतारावर वसलेल्या झोपडपट्टीवासियांना प्रशासनाकडून इशारा देण्यात आला आहे.
पावसाळ्यादरम्यान जोरदार पावसाने दरडी कोसळण्याची, पावसामुळे डोंगरावरुन वाहत येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलन होऊन घरांची पडझड होण्याची शक्यता असते. तसेच नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे झोपड्या वाहून जाण्याच्या संभाव्य घटना घडू शकतात. या भागातील धोकादायक इमारतींना - झोपड्यांना एस विभाग कार्यालयातर्फे सावधानतेच्या सूचना - नोटीस आधीच देण्यात आल्या आहेत. स्थलांतर न करता तेथेच राहणाऱया रहिवाश्यांची जबाबदारी त्यांची स्वत:ची असेल,असे स्पष्ट करण्यात आले आहे.