Aarey Forest : मेट्रोला नव्हे, तर आरेतल्या कारशेडला विरोध- आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 01:40 PM2019-09-10T13:40:15+5:302019-09-10T13:41:59+5:30
Save Aarey Movement: आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडला शिवसेनेचा विरोध
मुंबई: शिवसेनेचा मेट्रोला विरोध नसून केवळ आरेतील कारशेडला विरोध आहे, अशी भूमिका युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी मांडली. कारशेडसाठी होणाऱ्या झाडांच्या कत्तलीला आमचा विरोध असल्याचं आदित्य यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. यावेळी त्यांच्यासोबत वन्यजीव अभ्यासकदेखील उपस्थित होते.
आरेमध्येमेट्रो कारशेडसाठी वृक्षतोड केल्यास वन्यजीवांचं अस्तित्व धोक्यात येईल, अशी भीती आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली. आदित्य आणि त्यांच्या सोबत असलेल्या वन्यजीव अभ्यासकांनी आरेतील वन्यजीवांवर भाष्य केलं. यावेळी आरेतल्या बिबट्या, हरणांचे फोटो आणि व्हिडीओ दाखवण्यात आले. 'बिबट्या, हरणांचं वास्तव्य असलेल्या भागापासून अवघ्या काही मीटर अंतरावर कारशेड उभारलं जाणार आहे. कारशेडसाठी होणाऱ्या वृक्षतोडीमुळे वन्यजीवांचा अधिवासच धोक्यात येईल,' असं आदित्य ठाकरे म्हणाले.
प्रस्तावित कारशेडपासून केवळ 500 मीटर अंतरावर दुर्मिळ रानमांजर आढळून आली. याच भागात बिबट्यांचा मुक्तसंचार असल्याचं अनेक फोटोंमधून दिसून आलं आहे. या बिबट्यांनी कोणावरही हल्ला नाही केलेला नाही. आरेमध्ये विंचवाच्या 6 प्रजाती आढळून येतात. त्यामुळे आरे हा केवळ वृक्षतोडीचा विषय नाही. तर तो संपूर्ण पर्यावरण संस्थेचा विषय असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. आरे कारशेड प्रकरणात कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.