'आम्ही आशावादी आहोत, तुम्ही परत या'; किशोरी पेडणेकरांचं पुन्हा शिंदे गटाला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 06:24 PM2022-07-07T18:24:40+5:302022-07-07T18:27:31+5:30

शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलवल्यास आम्ही नक्की जाऊ, असं मोठं विधान दीपक केसरकर यांनी केलं आहे.

'We are optimistic, you come back'; Kishori Pednekar's appeal to CM Eknath Shinde group again | 'आम्ही आशावादी आहोत, तुम्ही परत या'; किशोरी पेडणेकरांचं पुन्हा शिंदे गटाला आवाहन

'आम्ही आशावादी आहोत, तुम्ही परत या'; किशोरी पेडणेकरांचं पुन्हा शिंदे गटाला आवाहन

Next

मुंबई- राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिंदे गटातील आमदारांनी रोखठोकपणे महाविकास आघाडीविरोधात भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. सत्तांतरनाट्यानंतर जवळपास पंधरा दिवसांनी आपापल्या मतदारसंघात परतलेल्या या आमदारांनी बंडखोरीमागचे कारण सांगताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाच प्रामुख्याने लक्ष्य केले. 

संजय राऊत यांच्यामुळे हे प्रकरण चिघळले. त्यांनी अत्यंत वाईट भाषेचा वापर केला. यामुळे आमदारांच्या मनात अधिक राग निर्माण झाला व त्यामुळेच उठाव केला, असे या आमदारांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर संजय राऊत उरलीसुरली शिवसेना देखील संपवतील, असा दावाही बंडखोर आमदारांकडून करण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी आज पुन्हा माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलवल्यास आम्ही नक्की जाऊ, असं मोठं विधान दीपक केसरकर यांनी केलं आहे. आम्ही थेट उद्धव ठाकरेंशी बोलू. मात्र आजुबाजूचे लोक त्यांनी बाहेर ठेवावे. तसेच आता आम्ही भाजपासह असल्यामुळे त्यांच्यासोबतही संवाद साधावा लागेल, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. 

दीपक केसरकरांच्या या विधानानंतर मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटातील आमदारांना पुन्हा आवाहन केलं आहे. आम्ही आशावादी आहोत, तुम्ही परत या, असं आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. तसेच भाजपाने शिवसेना फोडण्यासाठी विडे, नारळ दिलेत वाटतं, अशी टीकाही किशोरी पेडणेकरांनी भाजपावर केली आहे. 

दरम्यान, जून महिन्याच्या उत्तरार्धात राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सत्तेतून गेले होते. तर भाजपाच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. ३० जून रोजी झालेल्या शपथविधीनंतर एकनाथ शिंदे यांनी ४ जुलै रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध केले होते. 

आपली शिवसेना एकच आहे आणि एकच राहणार- उद्धव ठाकरे

आपली शिवसेना एकच आहे आणि एकच राहणार, असं सांगत धनुष्यबाण आपलाच आहे, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं. तुम्हाला भगवा आता ठामपणे पकडायचा आहे, असं म्हणत शिवसैनिकांनी जोमानं काम करण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. कुणाच्याही दबावाला बळी पडू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी साद उद्धव ठाकरे यांनी उपस्थित असणाऱ्या शिवसैनिकांना दिली. आतापर्यंत ज्यांना देता येणं शक्य होते, तेवढं दिलं. मात्र त्यांनी शेवटी गुण दाखवले. आता मात्र तुम्हाला देता येण्यासारखं माझ्याकडे काहीही नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

Web Title: 'We are optimistic, you come back'; Kishori Pednekar's appeal to CM Eknath Shinde group again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.