फिटनेस जरूरी है... म्हणत पोलिसाने कमी केले २५ किलो वजन
फिटनेस जरूरी है... म्हणत पोलिसाने कमी केले २५ किलो वजन
मनीषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : फिटनेस जरूरी है... म्हणत मुंबई पोलीस दलातील पोलीस शिपाई शशिकांत गंगावणे यांनी तब्बल २५ किलो वजन कमी केले आहे. नियमित योगा, योग्य आहार, झोप घेत त्यांनी ही किमया साधली आहे. कोरोनाच्या काळातही कर्तव्याबरोबर स्वतःची काळजी घेत, त्यांची ही फिटनेससाठीची धडपड सुरू आहे.
नवी मुंबईचे रहिवासी असलेले गंगावणे हे ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ते १९९२ च्या बॅचचे आहेत. गंगावणे सांगतात, वयाच्या ४७ व्या वर्षी अचानक वाढलेले वजन पाहून मलाच माझ्या भविष्याची चिंता वाटली. एवढे वजन घेऊन पुढील आयुष्य कसे काढायचे म्हणत सुरुवातीला हळूहळू योगा करण्यास सुरुवात केली. पहिल्या चार दिवसांतच एक किलो वजन कमी झाल्यामुळे विश्वास वाढला. त्यामुळे नियमित योगा सुरू केला.
हळूहळू धावण्याचे प्रयत्न सुरू केले. धावण्यामुळे वजन कमी होण्यास मदत झाली. धावणे, चालण्यासोबतच योगावर भर दिला. यातच पहिल्या तीन महिन्यांत १२ किलो वजन कमी झाले. त्यामुळे आत्मविश्वास वाढला आणि हा दिनक्रम नियमित सुरू ठेवला. कुठल्याही महागड्या जिम, ना प्रोटिनच्या मागे न धावता नियमित योगा, योग्य आहार, पुरेशा झोपेमुळे वजन कमी करणे शक्य झाले. कोरोनाच्या काळात फिट राहायला हवे. नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करत घरात नियमित योगा करून स्वतःची काळजी घेणे गरजेचे असल्याचे ते सांगतात.
कोरोनाच्या काळातही बंदोबस्तासह विविध जबाबदारीचे ओझे खांद्यावर असते. मात्र, तरी नियमित योगा करत स्वतःची काळजी घेताना ते दिसतात. ४९ व्या वर्षी त्यांची फिटनेसप्रती असलेली आवड पाहून कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांनी त्यांना बक्षीस दिले.