आम्ही पॉझिटिव्ह : हे आहेत खरे हिरो; यांच्यामुळे साफ राहतात मलजल वाहिन्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:07 AM2021-05-09T04:07:07+5:302021-05-09T04:07:07+5:30
कोरोना काळात करत आहेत मुंबई स्वच्छ ठेवण्याचे काम हे आहेत खरे हिरो; यांच्यामुळे साफ राहतात मलजल वाहिन्या लोकमत न्यूज ...
कोरोना काळात करत आहेत मुंबई स्वच्छ ठेवण्याचे काम
हे आहेत खरे हिरो; यांच्यामुळे साफ राहतात मलजल वाहिन्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चित्रपटांच्या पडद्यावर विविध भूमिका साकारत रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्यांना हिरोचा मानपान दिला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र कोरोना काळात आपापल्या प्रभागात मलजल वाहून नेणाऱ्या वाहिन्या अविरतरित्या साफ ठेवणाऱ्या मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपले काम चोखपणे बजावले आहे. यात महत्त्वाचे म्हणजे कामाचा ताण असताना, मनुष्यबळ कमी असताना आणि रोज सात किंवा आठपेक्षा जास्त तक्रारींचा निपटारा करत या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करण्याचा आदर्श घालून दिला असून, आपल्या आयुष्यातील खरे हिरो तर हे आहेत.
मुंबई महापालिकेच्या एल वॉर्ड अंतर्गत कुर्ला पश्चिमेकडील भाग येत असून, येथील कर्मचारी मुंबई साफ, स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे काम करत आहेत. कुर्ला येथील सुंदरबाग, न्यू मिल रोड, बैल बाजार, वाडिया इस्टेट, नवपाडा आणि लगतच्या परिसरात विकास बागूल, यडमलाई गणपती आणि रामदास भोंग हे महापालिकेचे कर्मचारी न थकता काम करत आहेत. दिवसाच्या २४ तासांपैकी कित्येक तास यांचे कामात जात आहेत. मनुष्यबळ कमी आहे, त्यामुळे कामाचा ताण येतो आहे किंवा दररोजच्या तक्रारी वाढत आहेत. मात्र, तरीही कोणतीही तक्रार न करता हे कमचारी मलजल साफ करण्याचे काम प्रामाणिकपणे करत आहेत. मलजल वाहून नेणाऱ्या वाहिन्यांमध्ये अनेकवेळा कचरा अडकतो, माती अडकते. त्यामुळे मलजल वाहत नाही. नेमके हेच साफ करण्याचे काम हे कर्मचारी करतात.
आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आल्याने त्यांना मॅनहोलमध्ये उतरावे लागत नाही. मात्र, पूर्वी या कर्मचाऱ्यांना मॅनहोलमध्येदेखील उतरावे लागत होते. परंतु, आता अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे हा त्रास कमी झाला आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, त्यांच्या घराचा प्रश्न निकाली निघावा, पिटि केसबाबत सकारात्मक विचार केला जावा, असे असंख्य प्रश्न सकारात्मकरित्या निकाली काढण्यात यावेत, असे या खात्यात काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. संपूर्ण कोरोना काळात केवळ मुंबई महापालिका अशी यंत्रणा आहे; जी २४ तास कार्यरत राहिली आहे. त्यामुळे मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवणाऱ्या मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचादेखील विचार झाला पाहिजे, असे म्हणणे मांडले जात आहे.