'तो' बेपत्ता वैमानिक सुरक्षित भारतात यावा- राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 06:27 PM2019-02-27T18:27:07+5:302019-02-27T18:27:53+5:30
पाकिस्तानविरुद्धच्या कारवाई दरम्यान भारताचा एक वैमानिक बेपत्ता
मुंबई: भारतीय हवाई दलाचं मिग-21 विमान कोसळल्याची घटना आज सकाळी घडली. परराष्ट्र मंत्रालयानं पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची माहिती दिली. याशिवाय वैमानिक बेपत्त झाल्याचंदेखील त्यांनी सांगितलं. हा वैमानिक सुरक्षित भारतात यावा अशी प्रार्थना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली.
आज सकाळी पाकिस्तानी हवाई दलाची विमानं भारताच्या हवाई हद्दीत घुसली. त्यांना भारतीय हवाई दलानं चोछ प्रत्युत्तर देत माघारी धाडलं. यावेळी भारतानं मिग 21 विमान गमावल्याची आणि वैमानिक बेपत्ता झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यानंतर राज ठाकरेंनी ट्विट केलं. 'आपला वायुसेनेचा एक वैमानिक बेपत्ता आहे. तो लवकरात लवकर सुरक्षित भारतात यावा अशी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रार्थना करतो,' असं राज यांनी ट्विटमध्ये म्हटलं.
आपला वायुसेनेचा एक वैमानिक बेपत्ता आहे. तो लवकरात लवकर सुरक्षित भारतात यावा अशी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रार्थना करतो. #IAFpilot#BringBackAbhinandan
— Raj Thackeray (@RajThackeray) February 27, 2019
भारतानं काल पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्ताननंही भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भारतानं पाकिस्तानचं एक विमान पाडलं. या कारवाईत भारतानंही एक मिग 21 विमान गमावलं आहे. तसेच एक वैमानिक बेपत्ता आहे. तो बेपत्ता जवान पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. त्याची सत्यता आम्ही पडताळून पाहत आहोत, असंही परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले आहेत.
पाकिस्तानच्या मीडिया आणि सरकारकडून खोट्या बातम्या पसरविण्यात आल्यानं तेथील सोशल मीडियावरही हा व्हिडीओ अन् फोटो व्हायरल झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानी सैन्याकडून भारताचे विमान पाडल्याचा दावा केला जात असला तरी भारतीय सैन्याकडून या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. पाकिस्ताननं एका विंग कमांडरला अटक केल्याचा दावा केला असून, त्याचं नाव अभिनंदन वर्थमान असल्याचं सांगितलं जातं आहे.