मुंबई : दसऱ्यानिमित्त आज शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्क येथे होत तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा हा बीकेसी मैदानावर होत आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली त्यानंतर शिंदे गट आणि शिवसेना हे दोन गट अनेक वेळा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. शिवसेना-शिंदे गटात सुरू असलेल्या सत्तासंघर्षादरम्यान उद्धव ठाकरे काय बोलतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यादरम्यान शिवाजी पार्क येथे होत असलेल्या दसरा मेळाव्यादरम्यान बाळासाहेबांचा आत्मा इथेच असणार याची आम्हाला खात्री आहे, असे विधान शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी केले आहे.शिंदेंच्या मेळाव्यावर टीका करताना गोऱ्हे म्हणाल्या की, एखादी परंपरा, इतिहास आमचाच आहे असे म्हणणे, हे उघड-उघड आमच्या पक्षावर घातलेला दरोडा आहे. आपल्यापैकी कोणाचा आत्म्यावर विश्वास असेल, कोणाचा नसेल. पण बाळासाहेबांचा आत्मा इथेच असणार याची आम्हाला खात्री आहे, असे निलम गोऱ्हे यांनी म्हटले.
याचबरोबर, आज शिवतीर्थावर राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक गोळा झाले आहेत, त्यांच्याकडे पाहून खरी शिवसेना कोणती हे लक्षात येते असे शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे म्हणाल्या. तसेच, एकनाथ शिंदे यांचा बीकेसीवर होत असलेल्या मेळाव्याबाबत बोलताना त्यांनी, बऱ्याचशा लोकांना ते कुठे निघालेत ते बऱ्याच जणांना माहिती नाही आहे, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे, मात्र शिवतीर्थावर कुठल्याही अमिषाला बळी न पडता लोक आले आहेत असे सांगितले.
दुसरीकडे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बीकेसीच्या मैदानावर सभा पार पडत आहे. एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी मोठं प्लॅनिंग केल्याचे दिसून आले आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते यावेत, यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून एसटीची सोय केलेली आहे. याशिवाय जे कार्यकर्ते पदाधिकारी सभेला येणार आहेत त्यांच्यासाठी मोठी सरबराई करण्यात शिंदे प्रशासन व्यस्त असल्याचे दिसून आले आहे.