फेरीवाल्यांची आम्हालाच दमदाटी; अंगावर येतात! मुंबईतील दुकानदारांमध्ये भितीचे वातावरण
By जयंत होवाळ | Published: March 4, 2024 08:15 PM2024-03-04T20:15:30+5:302024-03-04T20:16:12+5:30
दुकानदारांवर फेरीवाल्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचा दावा
जयंत होवाळ, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: फेरीवाल्यांकडून दुकानदारांना धमक्या देणे, मारहाण करणे या प्रकारात वाढ होत असल्याने पदपथ ताब्यात घेणाऱ्या फेरीवाल्यांना तात्काळ हटवावे , तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी 'फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर्स असोसिएशन'ने केली आहे. अलीकडेच असोसिएशनचे मुख्य सदस्य अतुल व्होरा यांच्यावर तसेच दादर परिसरात शिरीष गोटके या दुकानदारांवर फेरीवाल्यांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. या पार्श्ववभूमीवर असोसिएशनने आक्रमक भूमिका घेतली आहे.
उपनगरात अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनी पदपथ काबीज केले आहेत. याच ठिकाणी ते धंदा करतात. त्यामुळे अनेक ठिकाणच्या पदपथांवरून जाणे पादचाऱ्यांना अवघड झाले आहे. काही फेरीवाल्यांनी तर दुकानांच्या समोरील मोकळ्या जागेवर कब्जा केला आहे. त्यामुळे दुकानात येणाऱ्या ग्राहकांना अडथळा निर्माण होतो. यावरून दुकानदार आणि फेरीवाले यांच्यात खटके उडतात. परंतु फेरीवाले त्यांना जुमानत नाहीत. उलट ते आम्हालाच दमदाटी करतात, प्रसंगी अंगावर येतात, अशी दुकानदारांची तक्रार आहे.
रविवारी कांदिवली येथे व्होरा यांच्यावर फेरीवाल्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. गोटेक यांच्यावरही दादर परिसरात हल्ला झाला होता . याबाबत पोलिसात तक्रार केल्यास अदखलपात्र गुन्हा नोंदवला जातो. त्यामुळे फेरीवाल्यांमध्ये भीती राहिलेली नाही. पादचाऱ्यांनी पदपथवर बसण्यास त्यांना हरकत घेतली तर ते त्यांनाही धमकावतात , असा आरोप असोसिशनने केला. फेरीवाल्यांवर कारवाई झाली तरी ते काही वेळाने पुन्हा त्याच ठिकाणी बस्तान बसतात. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.