मुंबई : शिवसेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे शिवसेना हे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे समीकरणच आहे. शिवसेनेला शह दिल्याशिवाय महापालिकेत पाऊल ठेवता येत नाही हे दिग्जांना ठाऊक असल्याने प्रत्येक निवडणुकीत आमची ठसन सेनेशी आहे, असे प्रत्येक राजकीय पक्षाला वाटते. यंदा होणारी निवडणूकही त्यास अपवाद नसून, आता शिंदे आणि ठाकरे गटाच्या वादाने महापालिकेच्या निवडणुकीत जोरदार ठसन होणार आहे. आणि असे असले तरी प्रत्येक राजकीय पक्षाला आपला स्पर्धक उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच वाटत असून, काँग्रेसनेदेखील आमची लढाई शिवसेनेशी आहे, असे म्हणत जोरदार तयारी सुरू केली आहे.
काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी सांगितले की, आमची राजकीय स्पर्धा शिवसेनेबरोबर राहील. भाजपबरोबर आमची स्पर्धा कधीच नव्हती. राष्ट्रवादीचा तर विषयच नाही. आज दुर्दैवाने सेना विभागली गेली. दरम्यान, यापूर्वी काही जागा आम्ही फार कमी मतांनी हरलो आहोत. त्यामुळे मी भावनिक होऊन काही बोलत नाही. मी सगळ्यांचा अभ्यास केला आहे. आता जी राजकीय परिस्थिती आहे त्याचा फायदा आम्हाला आहे. आमचा पारंपरिक मतदार आमच्यापासून दूर जाणार नाही. लोक आता उघड उघड बोलू लागले आहेत आमचा राजकीय शत्रू हा भाजप आहे. आता २०१७ च्या पुढे चार पाऊले जाऊ, असेही ते म्हणाले.
तिकीट नाही तर मग पैसे परत
आम्ही उमेदवार निवडण्यासाठी सहा महिन्यांपूर्वीच काम सुरू केले आहे. काही जागांवर दोन उमेदवार आहेत. काही ठिकाणी चार ते पाच उमेदवार आहेत. ही उमेदवारी देताना आम्ही आवाहन केले तेव्हा चारशेवर अर्ज आले. अर्ज करताना पैसे भरण्यास सांगितले तर कमी अर्ज येतील, असे आम्हाला वाटले. पण तेव्हादेखील अर्जांची संख्या शेकडोने होती. ९०० अर्ज आले होते. याचे मला आश्चर्य वाटले, असेही भाई जगताप यांनी सांगितले.
निर्णय केंद्रात
आघाडी झाली तरी आघाडीचे नुकसान झाले नाही. मात्र यावर एक धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. महाविकास आघाडीचे नुकसान होणार नाही. झाला तर फायदाच होईल. मात्र याचे निर्णय घेण्याचे अधिकार केवळ केंद्रीय नेतृत्वालाच आहे.