मुंबई : गर्दी रोजच्यासारखीच होती...त्यातच कोसळणारा पाऊस. पण हातात छत्री नाही. म्हणून पाऊस थांबण्याची वाट बघत पुलावर उभी होते. काही क्षणांतच गर्दीचा लोंढा कधी अंगावर आला कळलंच नाही... श्वास कोंडला... नक्की काय घडतंय, हे समजत नव्हतं. माझ्या पुढ्यात एका फेरीवाल्याची गोणी पडली अन् त्यात माझी चप्पल अडकली. पण कसंबसं स्वत:ला सावरत त्या गोणीवरुन उडी मारून मी खाली उतल्याने बचावले...अक्षरश: मृत्यूच्या दारातूनच परत आले... असं सुदैवानं या दुर्घटनेतून बाचवलेली शांती खवणेकर ही तरुणी सांगत होती.घाटकोपर येथे राहणारी शांती वरळीत एका खासगी कंपनीत नोकरी करते. नेहमीप्रमाणे ती परळला उतरून टॅक्सी पकडण्यासाठी एल्फिन्स्टन रोडच्या दिशेने येत होती. जोरदार पाऊस सुरू होता आणि जवळ छत्री नसल्याने तिने ब्रीजवरच थांबण्याचा निर्णय घेतला. तिला तिथे अचानक गर्दी वाढल्याचे जाणवले. ती म्हणाली की, एल्फिन्स्टन पुलाच्या पायºयांवर आम्ही उभे होतो. गर्दी वाढल्यामुळे मी मागे ढकलले जात होते. गर्दीमुळे गुदमरायला होत होते, श्वास घेता येत नव्हता. मी पण पटापट खाली जाण्याचा प्रयत्न करू लागले. पुढ्यात पडलेल्या एका गोणीवरून उडी मारून मी खाली उतरल्याने बचावले. मुंबईमध्ये घरातून बाहेर पडलेला माणूस पुन्हा घरी पोहचत नाही, तोपर्यंत त्याच्या जिवाची काही शाश्वती नसते. हाच धडा पुन्हा एकवार यातून मिळाला.नेहा चौधरी कामानिमित्त परळच्या पुलावरून उतरत असताना गर्दीत कधी फसल्या ते त्यांना कळलेच नाही. दुघंटनेची बातमी पसरताच, घरातून फोन सुरू झाले. पण त्या स्थितीत फोन घेणे शक्य नव्हते. या गर्दीत मोबाइल, हातातील पर्स खाली पडली. लोंढ्याच्या फोर्समुळे मीही बाहेर फेकले गेले आणि जणू मृत्यूच्या दाढेतून मी सुखरूप बाहेर आले, असे त्यांनी सांगितले.चष्मा विसरलो, म्हणून वाचलोयाच गर्दीत शिरत असताना फोन खणखणल्यामुळे ऐरोलीचे दीपेश पाटील सुखरुप बचावल्याचे सांगतात. ब्रीजवर दुर्घटना होण्याच्या काही मिनिटांपूर्वीच चष्मा विसरलो, म्हणून परळच्या नातेवाईकांच्या घरातून फोन आला. म्हणून मागे फिरलो आणि वाचलो, असे ते म्हणाले.
श्वासच कोंडला...आम्ही मृत्यू जवळून पाहिला, पुढ्यात पडलेल्या गोणीवरून उडी मारून खाली उतरल्याने बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 4:26 AM