मुंबई- अंधेरीच्या विधानसभा पोटनिवडणुकीत आज महाविकास आघाडी आणि भाजपा-शिंदे गटाच्या युतीच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा धुरळा जरी उडाला असला तरी भाजपा आणि ठाकरे गटाने सावध पवित्रा घेतल्याचं दिसून येतंय.
अंधेरीची पोटनिवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आणि शिंदे गट- भाजपासाठी लिटमस टेस्ट आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक असून मतदार कोणाला कौल देतात याकडे सर्वांतं लक्ष आहे. मात्र याचदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा साधला आहे.
भाजपा उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होणार; रवींद्र वायकरांनी समजावलं मतांचे गणित
उद्धव ठाकरे यांच्याकडे आता काही राहिले नाही. राज्य गेलं, मुंबई गेली. आता दक्षिण मुंबईतही भाजपाचाच खासदार जिंकून येणार असं नारायण राणे यांनी म्हटलं. तसेच दिवगंत रमेश लटके आज असते, तर ते शिंदे गटात असते, असं विधानही नारायण राणेंनी केलं. हिंमत असेल तर सरकार पडून दाखवा, असे म्हणत होते. अखेर आम्ही सरकार पाडून दाखवलं. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी बडबड करणं बंद करावी, असा निशाणा नारायण राणेंनी लगावला.
दरम्यान, भाजपा घाणेरडे राजकारण करत नाही. पुढेही करणार नाही. ऋतुजा लटकेंचा राजीनामा ही तांत्रिक बाब होती. त्याचा भाजपाशी संबंध नव्हता. भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना-आरपीआय म्हणून मी प्रतिनिधित्व करणार आहे. विरोधकांचे आव्हान वाटत नाही. अपक्ष म्हणून मी ४८ हजार मते मी घेतली. आता तर भाजपासह युती पाठिंबा आहे. त्यामुळे ३० हजारांच्या मताधिक्याने निवडून येऊ. वेळोवेळी कोण मदत करतं हे अंधेरीतील जनतेला माहिती आहे. जनता विकासाला साथ देईल. गोरगरीब जनतेसाठी कोणी काम केले हे लोकांना माहिती आहे. अंधेरीच्या भविष्याची ही निवडणूक आहे. ६ तारखेला मुरजी पटेल आणि भाजपा काय आहे हे विरोधकांना कळेल असं सांगत मुरजी पटेल यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
सहानुभूती मिळवण्याचं षडयंत्र-
अंधेरी पूर्व मतदारसंघात प्रत्येक महिला मुरजी पटेल यांना काका म्हणते. प्रत्येक नागरीक काकांना भेटतोय. ही लढाई राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना अशी आहे. सहानुभूतीच्या जोरावर निवडणूक लढवली जात आहे. ऋतुजा लटकेंचा राजीनामा न स्वीकारण्यामागे ठाकरे गटाचं षडयंत्र होतं. या माध्यमातून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात होता असा आरोप मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे गटाला लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"