‘वुई कॅन डू इट...’ दहावी, बारावीच्या ऑफलाइन परीक्षेसाठी अभियान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 06:37 AM2021-03-12T06:37:23+5:302021-03-12T06:37:36+5:30
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षांबाबत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन घ्यायची असून, त्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांना सज्ज करण्यासाठी ‘वुई कॅन डू इट’ असे एक अभियान चालविले जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी एका बैठकीत ही माहिती दिली.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षांबाबत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, दहावी बोर्डाचे प्रकल्प समन्वयक दिनकर पाटील आदी उपस्थित होते. संबंधित सर्वांनी एकत्र येऊन ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन गायकवाड यांनी केले.
प्रॅक्टिकल परीक्षेबाबत राज्यपातळीवर एकसारखा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सह्याद्री वाहिनीवर शासनामार्फत व्याख्यानमाला सुरू असून, परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी महत्त्वाचे प्रश्न, स्वाध्याय यासाठीही कार्यक्रम घेतले जातील. विद्यार्थ्यांना सामान्यत: पडणाऱ्या प्रश्नांबाबत वेबसाइटवर लवकरच ‘एफएक्यू’ देण्यात येणार आहेत. बंद निवासी शाळांतील फक्त दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची आणि परीक्षेसाठी सुविधा देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.