Join us

Rajya Sabha Election: सध्या खिशात पाचशेच्या दोन नोटा; आपले साधे वडा-पावचे वांदे, हितेंद्र ठाकूरांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2022 8:42 AM

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील सर्व आमदारांना मुंबईतील नामांकित फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

मुंबई/वसई- कोणी कितीही प्रयत्न केले तरी राज्यसभेच्या सहापैकी चार जागा महाविकास आघाडी जिंकणारच, त्यानंतर जल्लोषासाठी पुन्हा एकत्र येऊ, असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला. निवडणुकीच्या तीन दिवस आधी या निमित्ताने महाविकास आघाडीने ऐक्याचे प्रदर्शन घडविले. 

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील सर्व आमदारांना मुंबईतील नामांकित फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. तर भाजपाचे सर्व आमदार बुधवारी सायंकाळी ६ पासून कुलाब्यातील हॉटेल ताज प्रेसिडेंटमध्ये मुक्कामी जाणार आहेत. १० जूनला मतदानास जाईपर्यंत त्यांचा या ठिकाणी मुक्काम असेल. याचपार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांनी टोला लगावला आहे. 

माध्यमांनी हितेंद्र ठाकूर यांना तुम्हीही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहणार का?, असा प्रश्न विचारला. यावर आम्हाला फाईव्ह स्टार हॅाटेलमध्ये राहणं परवडणार नाही आणि आपणाला कोणत्याही पक्षाकडून आमंत्रण ही नाही. सध्या खिशात पाचशे- पाचशेच्या दोन नोटा आहेत. आपले साधे वडापावचे वांदे आहेत, असं उत्तर हितेंद्र ठाकूर यांनी दिलं. तसेच आमच्या सौभाग्यवती चांगल जेवण बनवतात, त्यामुळे आमची तब्येत बरी आहे, असा उपरोधात्मक टोलाही हितेंद्र ठाकूर यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, महाविकास आघाडीतील तसेच समर्थित अपक्ष आमदारांमध्ये निधी वाटपावरून नाराजी असल्याची दखल मुख्यमंत्री ठाकरे व शरद पवार यांनीही त्यांच्या भाषणातून घेतली. या निवडणुकीनंतर सगळ्यांना घेऊन बसा आणि सगळ्यांचे समाधान करा, असा सल्ला शरद पवार यांनी दिला. राज्यसभा निवडणुकीनंतर या विषयी तातडीने बैठका घेऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

बैठकीला उपस्थित अपक्ष व लहान पक्षांचे आमदार-

कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, आशिष जयस्वाल, नरेंद्र भोंडेकर, किशोर जोरगेवार, देवेंद्र भुयार, गीता जैन, मंजुळा गावित, श्यामसुंदर शिंदे, संजयमामा शिंदे, चंद्रकांत पाटील, विनोद निकोले, विनोद अग्रवाल असे १३ अपक्ष वा लहान पक्षांचे आमदार आजच्या बैठकीला उपस्थित होते. 

टॅग्स :हितेंद्र ठाकूरमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकारराज्यसभा