लोकमत न्युज नेटवर्क
मुंबई : चौकात वाहतूक कर्मचारी उभा असो अथवा नसो, बहुतांश बेशिस्त वाहनचालक रेड सिग्नल जम्पिंग करून वाहतूक नियमांचा सर्रास भंग करत असल्याचे मुंबईत दिसत आहे. वाहनचालकांची ही अतिघाई बहुतांशवेळा अपघातास निमंत्रण देणारी ठरत आहे. पोलिसांनी दंड केल्याशिवाय वाहनचालकांना नियमांची आठवणच होत नाही, अशीच परिस्थिती आहे.
मुंबई व उपनगरात वाहतुकीच्या नियमनासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित आहे. येथे दररोज वाहनांची मोठी वर्दळ असते. काही चौकांत वाहतूक कर्मचारी नसले तरी सिग्नल यंत्रणा मात्र अपवादवगळता निर्धारित वेळेप्रमाणे कार्यरत राहाते. रेड सिग्नल पडल्यानंतर समोरील बाजूचे वाहनचालक थांबतात. थांबलेल्यांपैकी तीन ते चार वाहनचालक मध्येच प्रवेश करतात. अशावेळी दुसऱ्या बाजूने येणारे वाहनचालकही गोंधळून जातात. शहरातील उमरशी बाप्पा चौक, वरळीनाका, भायखळा स्थानक, पांजरापोळ जंक्शन येथे सर्वात जास्त वाहनचालक रेड सिग्नल जम्प करत असल्याचे समोर आले आहे. वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या अशा वाहनचालकांवर कडक कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
सिग्नलवर दोन ते तीन मिनिटे थांबल्याने काहीच फरक पडत नाही. मात्र, काही वाहनचालक विनाकारण घाई करून नियम तोडतात. यामुळे अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे अशा वाहनचालकांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.
अमित माने, वाहनचालक
वाहतूक नियम हे वाहनचालकांच्या सुरक्षेसाठीच असतात. या नियमांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे सिग्नलसह सर्वच ठिकाणी नियम पाळणे गरजेचे आहे. मी स्वत: वाहन चालविताना हे नियम पाळतो.
कुणाल काेळेकर, वाहनचालक
बऱ्याच वेळा सिग्नलवर रेड लाईट लागलेली असताना मी थांबतो, परंतु पाठीमागून येणारी वाहने सरळ पुढे निघून जातात. अशावेळी सिग्नल पाळून आपण चूक करतोय का, असा प्रश्न पडतो. परंतु आजच्या तरुणाईने तरी वाहतूक नियम पाळणे गरजेचे आहे. वाहतुकीचे नियम पाळण्यात पोलिसांचा नव्हे, तर आपलाच फायदा आहे.
- अनिकेत चव्हाण, वाहनचालक
दररोज ६०० वाहनधारकांना दंड
दररोज ६०० वाहनधारकांना दंड ठोठावला जातो. हा आकडा कधी पाचशेच्या घरातही जातो. यामध्ये सर्वाधिक वाहनधारक हे सिग्नल तोडणारे, वाहन चालविण्याचा परवाना नसलेले आणि ट्रीपल सीट असे असतात. वाहतूक शाखेच्यावतीने अनेकवेळा मोहीम राबवून वाहनधारकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु नांदेडकरांमध्ये फारसा फरक पडलेला नाही.
स्वतःसाठी नियम पाळावा
दंड लागतो म्हणून नियम पाळण्यापेक्षा स्वत:ची जबाबदारी म्हणून प्रत्येक वाहनधारकाने वाहतूक नियमांचे आणि कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच झाले तर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी दूर होईल, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.