"आम्ही तिघांनाच राजे मानतो; पुतळे जाळलेत तरी आमची भूमिका बदलणार नाही"
By मुकेश चव्हाण | Published: October 10, 2020 06:20 PM2020-10-10T18:20:50+5:302020-10-10T18:21:34+5:30
ही भूमिका वैचारिक आहे,आणि ती कायम राहील, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले आहे.
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि भाजपा नेते उदयनराजे भोसले आमनेसामने आले आहेत. आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर इतरांचे रद्द करा, असे म्हणणे चुकीचे आहे. ही मागणी करणारा राजा बिनडोक आहे. राज्यघटना कळत नसताना त्यांना भाजपाने राज्यसभेवर कसे पाठवले, असा सवाल उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी नाव न घेता खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला होता. या वक्तव्यानंतर उदयनराजेंच्या समर्थकांनी प्रकाश आंबेडकरांवर टीकास्त्र सोडलं होतं. आता त्यालाच प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
प्रकाश आंबेडकर ट्विट करत म्हणाले की, राजे सम्राट अशोक,छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तिघांनाच आम्ही राजे मानतो. वंचित बहुजन आघाडीने घेतलेली भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूची आहे. पुतळे जाळा, काहीही केले तरी आम्ही आमची भूमिका व पक्षाची भूमिका बदलणार नाहीत. ही भूमिका वैचारिक आहे,आणि ती कायम राहील, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले आहे.
राजे सम्राट अशोक,छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तिघांनाच आम्ही राजे मानतो. वंचित बहुजन आघाडीने घेतलेली भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूची आहे. पुतळे जाळा, काहीही केले तरी आम्ही आमची भूमिका व पक्षाची भूमिका बदलणार नाहीत. ही भूमिका वैचारिक आहे,आणि ती कायम राहील.
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) October 9, 2020
तत्पूर्वी, मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, मराठा समाजाच्या काही संघटना ज्या भूमिका घेतायेत ते मराठा समाजाच्या पायावर दगड मारणारी भूमिका घेतात असं सांगत त्यांनी महाराष्ट्र बंदला पाठिंबा न देणाऱ्या संघटनांवर टीका केली, तसेच एमपीएससी परीक्षा शासनाने म्हटलं म्हणजे होणार, आम्ही होऊ देणार नाही ही भूमिका घेणे योग्य नाही, सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अधीन राहून परीक्षा होऊद्या, आरक्षण घटनेच्या आधारे आहे की नाही हे सुप्रीम कोर्ट ठरवणार आहे, ही कायदेशीर बाब आहे असं सांगत त्यांनी संभाजीराजेंच्या भूमिकेला विरोध केला.
तसेच दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे असं कुठेही वाटलं नाही. एक राजा बिनडोक आहे, तर दुसरे संभाजीराजे त्यांनी भूमिका घेतली हे बरोबर आहे परंतु त्यांनी इतर मुद्द्यावर भर देतायेत. घटना कळत नसताना भाजपानं राज्यसभेवर पाठवलं कसं? हा प्रश्न उपस्थित होतो, संभाजीराजे आरक्षण सोडून इतर मुद्द्यावर जास्त भर देतात अशा शेलक्या शब्दात प्रकाश आंबेडकरांनी संभाजीराजे आणि नाव न घेता उदयनराजेंवर टीका केली आहे. तसेच मी कोणाला अंगावर घेण्याला घाबरत नाही असंही त्यांनी सांगितले.
आमच्या बंधुंवर वक्तव्य करणे मला पसंत पडले नाही- खासदास छत्रपती संभाजीराजे
प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आहेत. शाहू महाराज आणि बाबासाहेब यांचे चांगले संबंध होते. आमच्या बंधुंवर वक्तव्य करणे मला पसंत पडले नाही, त्यांनी तसे वक्तव्य करु नये, माझ्याबद्दल ते काही बोलले असतील तर ती लोकशाही आहे, असं मत खासदार छत्रपती संभाजीराजेंनी प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर व्यक्त केलं होतं.
ओबीसी कोट्यातून आरक्षण मागू नये- प्रकाश आंबेडकर
मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. तसेच कोणत्याही परिस्थितीत ओबीसी गटातून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी केली जाणार नाही, याची काळजी घेतली जावी. दोन्ही समाजांनी आपापल्या भूमिकेवर ठाम राहावे, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.