मुंबई - आम्ही पाचव्या मजल्यावर राहतो. आग लागल्याची घटना समजताच इमारतीत बोंबाबोब सुरू झाली. काही जण म्हणत होते गच्चीवर चला, जीव वाचवण्यासाठी मी आणि माझा मुलगा, बायको गच्चीवर जायचा प्रयत्न करत होतो. मात्र पायऱ्यांवर मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने गच्चीवर जाता आले नाही. पायऱ्यांवरून खाली उतरलो, असा भीतीदायक प्रसंग हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात दाखल असलेल्या संजय जाधव याने सांगितला.
हे कुटुंब गेली १० वर्षांहून अधिक काळ या इमारतीत राहत आहे. त्यांचा मुलगा शिक्षण घेत आहे. या दुर्घटनेत जखमी झाल्याने जाधव त्यांची पत्नी साक्षी व मुलगा चिरायू यांच्यावर उपचार सुरू असून आहेत.
आगीपेक्षा धुरामुळे उडाला गोंधळ
■ आगीपेक्षा धुरामुळे खूप मोठा गोंधळ निर्माण झाला होता.आम्ही तिघे मोठे आहोत. मात्र, ज्यांची लहान मुले होती, त्यांचे मात्र भयानक हाल झाले.■ कारण धुराचे लोट संपूर्ण मजल्यावर पसरले होते. आमच्या पाचव्या मजल्यावर ही परिस्थिती होती तर पहिल्या, दुसऱ्या मजल्यांवर राहणाऱ्यांचे किती हाल झाले असतील, असे जाधव यांनी सांगितले.