लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोणते काम केले नाही. करणार नाही. जे काम बंद करून अडीच वर्षे घरात बसले होते; त्यांनी बंद केलेले सगळे काम आम्ही सुरू केले आहे. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी केलेली घाण आम्ही आता स्वच्छ करत आहोत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाची (एमटीएचएल) पाहणीवेळी विरोधकांना लगावला.
१२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एमटीएचएल खुला करण्यात येणार असून, एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाची पाहणी केली. आम्ही यापूर्वी जे प्रकल्प पूर्ण केले तेव्हा निवडणुका होत्या का? असा सवाल करत मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही विरोधकांच्या आरोपांकडे लक्ष देत नाही. आमचे सरकार खोटी आश्वासने देऊन फसविण्याचे काम करत नाही. आम्ही प्रत्यक्षात काम करत आहोत.
- मुंबई टान्स हार्बर लिंकच्या लोकार्पणादरम्यान मुंबईतल्या इतर प्रकल्पांचे लोकार्पणही होणार आहे. एमएमआरडीएच्या प्रकल्पांचे लोकार्पण रिमोटद्वारे होणार असून, राज्यातही डीप क्लीन मोहीम सुरू करणार आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
- पर्यावरणाचा समतोल राखून प्रकल्पाचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे शिवडी समुद्र परिसरात फ्लेमिंगो पक्षी वाढले आहेत.
- चिर्ले टोल प्लाझाजवळील वाहतूक नियंत्रण केंद्राला (कमांड सेंटर) शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली.
- मविआबद्दल मुख्यमंत्री म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये अजून नेता ठरत नाही. आमच्याकडे नेता नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्याकडे अजून नेता ठरत नाही. आम्हाला त्यांची चिंता नाही. २०२४ ला अब की बार...मोदी सरकार चारसो पार, असे जनता म्हणते असल्याचेही त्यांनी सांगितले.