'आम्हाला बुलेट ट्रेन नको, त्यापेक्षा चांगली रेल्वे द्या', पंतप्रधान मोदींकडे बारावीत शिकणा-या विद्यार्थिनीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 11:33 AM2017-10-02T11:33:18+5:302017-10-02T11:35:18+5:30
मुंबईतील एका मुलीने ऑनलाइन याचिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 'आम्हाला बुलेट ट्रेन नको, त्यापेक्षा चांगली रेल्वे द्या', अशी मागणी केली आहे. श्रेया चव्हाण असं या मुलीचं नाव असून ती बारावीत शिकत आहे.
मुंबई - परळ - एल्फिन्स्टन स्थानकांवरील ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर बुलेट ट्रेनला होणारा विरोध अजून तीव्र झाला असून, अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. मुंबईतील एका मुलीने ऑनलाइन याचिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 'आम्हाला बुलेट ट्रेन नको, त्यापेक्षा चांगली रेल्वे द्या', अशी मागणी केली आहे. श्रेया चव्हाण असं या मुलीचं नाव असून ती बारावीत शिकत आहे. शुक्रवारी संध्याकाळी सुरु करण्यात आलेल्या याचिकेवर अद्याप दहा हजार लोकांनी स्वाक्षरी केली आहे. 20 सप्टेंबर रोजी आपल्या मैत्रिणीचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्यामुळे श्रेया संतप्त आहे.
'विद्यार्थी असणा-या आपल्या मैत्रिणीच्या मृत्यूनंतर आम्ही हा मुद्दा उचलण्याचा निर्णय घेतला. जर विद्यार्थी लोकलने कॉलेजला जाऊ शकत नसतील, तर मग बुलेट ट्रेनचा काय अर्थ आहे ?' असं श्रेया चव्हाण बोलली आहे. Change.org वर सुरु करण्यात आलेल्या याचिकेमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. याचिकेत लिहिण्यात आलं आहे की, 'आकडेवारीनुसार बोलायचं झालं तर, मुंबईतील ट्रॅकवर दिवसाला नऊ लोक आपला जीव गमावतात. अशा परिस्थितीत पैसा मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनवर खर्च करण्यापेक्षा लोकल ट्रेनची स्थिती सुधारण्यावर खर्च झाला पाहिजे'.
श्रेया चव्हाण आणि तिची मैत्रीण तनवी यांनी आपल्या मैत्रिणीच्या मृत्यूनंतर हा मुद्दा उचलण्याचा निर्णय घेतला होता. मिठीबाई कॉलेजची 17 वर्षीय विद्यार्थिनी मैत्री शाह हिचा लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झाला होता. बोरिवली ते दहिसदरम्यान प्रवास करत असताना ही घटना घडली होती. शुक्रवारी एल्फिन्स्टन - परळ ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर श्रेया चव्हाण आणि तनवी यांनी ही ऑनलाइन मोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतला.
शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या आसपास एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाल्याने आठ महिलांसहिक 22 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत 38 जण जखमी झाले होते. केईएम रुग्णालयात शनिवारी आणखी एका जखमीचा मृत्यू झाला आणि मृतांचा आकडा 23 वर पोहोचला.
एलफिन्स्टन- परेल पुलावर शुक्रवारी सकाळी नेमकं काय घडलं?
- सकाळी 9.30 च्या सुमारास पावसाची मोठी सर आली.
- त्याचवेळी मध्य रेल्वेवरील परळ आणि पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन स्टेशनवर एकाचवेळी लोकल आल्या.
- त्यामुळे बाहेर पडणाऱ्या पादचारी पुलावर गर्दी झाली.
- त्याचवेळी पत्रा कोसळल्याचं सांगण्यात आलं.
- गर्दीच्या वेळी मोठा आवाज झाल्याच्या गैरसमजातून धावपळ सुरु झाली.
- ब्रिज पडत असून शॉर्ट सर्किट झाल्याची अफवा पसरली, लोक मिळेल ती जागा पकडून बाहेर पडू लागले
- एकमेकांना तुडवत लोकांची धावपळ सुरु झाली
- सकाळी 9.30 च्या सुमारास थेट जखमी आणि मृतांचा आकडा समोर आला. तिघांचा मृत्यू.
- जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
- काही मिनिटांतच मृतांचा आकडा वाढत गेला