‘आम्ही नाही त्यातले!’; शिक्षकांची भूमिका
By admin | Published: May 26, 2017 04:12 AM2017-05-26T04:12:25+5:302017-05-26T04:12:25+5:30
बोरीवलीच्या अजित पवार कॉलेजमधील शिक्षकांचे जबाब चारकोप पोलीस नोंदवत आहेत. मात्र या शिक्षकांनी ‘आम्ही नाही त्यातले’ अशी भूमिका चारकोप पोलिसांसमोर घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बोरीवलीच्या अजित पवार कॉलेजमधील शिक्षकांचे जबाब चारकोप पोलीस नोंदवत आहेत. मात्र या शिक्षकांनी ‘आम्ही नाही त्यातले’ अशी भूमिका चारकोप पोलिसांसमोर घेतली आहे. त्यामुळे अत्यंत संवेदनशील असलेल्या या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.
बोरीवलीच्या अजित पवार कॉलेजचा मुख्याध्यापक प्रशांत गायकवाड आणि ट्युशन टीचर मकरंद गोडस यांना पोलिसांनी अटक केली. मात्र या प्रकरणात फक्त या दोघांचाच हात नसून यात अजून काही लोकांचा समावेश असल्याचे चारकोप पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानुसार या कॉलेजच्या शिक्षकांचे जबाब नोंदवण्याचे काम सध्या पोलीस करत आहेत. मात्र जबाब नोंदवताना केल्या जाणाऱ्या चौकशीत या प्रकरणाबाबत काहीही माहीत नसल्याचे या शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे.
बुधवारी या कॉलेजच्या पाच शिक्षकांचे जबाब पोलिसांनी नोंदवले. ज्यात ते एकमेकांवर प्रकरण ढकलत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवडक पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाची नियुक्ती केली आहे.
सोमवारी महाविद्यालयांच्या नावांची निश्चिती
बोरीवलीच्या नामदार अजित पवार ज्युनियर महाविद्यालयाची मान्यता रद्द झाल्यावर अकरावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना आता दुसऱ्या महाविद्यालयांमध्ये समायोजित करण्यात येणार आहे. सोमवार, २९ मे रोजी पवार महाविद्यालयाजवळच्या पाच ते सहा महाविद्यालयांची निश्चिती करून यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाचे उपसंचालक बी.बी. चव्हाण यांनी जाहीर केले.
अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत महाविद्यालयाची नोंदणी केली होती. पण पवार महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यावर आॅनलाइन नोंद केली नाही. पालक आणि विद्यार्थ्यांना अंधारात ठेवून तब्बल ४८५ विद्यार्थ्यांना या महाविद्यालयाने प्रवेश दिला. काही खासगी क्लासच्या सहकार्याने अनधिकृतपणे विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन अधिकचे शुल्क त्यांच्याकडून आकारले होते. या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत.