मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणुकांबाबत भाष्य केलं. आगामी वर्षात सर्वात मोठं आव्हान हे निवडणुकांचं असणार आहे. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाला जिंकायचं आहे. त्यासाठी, युती करणार का, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला होता. त्यावर, आम्हाला वेगळं व्हायचं नाहीए, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी युतीचे संकेत दिले आहेत. मात्र, आता युतीचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात येऊन पडल्याचे दिसून येते.
यंदाच्या वर्षाच्या अखेरच्यादिनी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरत्या वर्षाताली आव्हानं पेलल्याच सागितलं. तसेच गतवर्षी राज्यात विकासाची अनेक कामे झाली असून राज्य प्रगतीप्रथावर असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच, येणाऱ्या वर्षात सरकारसमोर कुठली आव्हाने आहेत, असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, राज्यासमोर दुष्काळाचं आव्हान मोठं आव्हान आहे. मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्यातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न समोर उभा आहे, त्याला सामोरे जायचं आहे. यासह अनेक प्रश्न राज्यासमोर आहेत. पण, सर्वात मोठं आव्हान आहे, ते म्हणजे 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकांचे. विशेष म्हणजे या निवडणुका जिंकून पुन्हा केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपाचं सरकार आणायचंय, हेच आमच्यासमोरील सर्वात मोठ आव्हान असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. त्यावर, शिवसेनेसोबत की वेगळं? असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नास उत्तर देताना, आम्हाला वेगळं व्हायचं नाही, असे उत्तर फडणवीस यांनी दिले आहेत.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सेना-भाजपची युती होणार का, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर अद्यापही गुलदस्त्यात आहे. कारण, युतीबाबात भाजपाची आग्रही भूमिका आहे. पण, शिवसेनेकडून कुठलाही ठोस प्रतिसाद देण्यात येत नाही. त्यामुळे युतीचे कोडं अद्याप उलगडलं नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा एकदा स्पष्टीकरण देताना, युतीचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात टाकला आहे.