Join us

आम्ही रात्रीच्या, पहाटेच्या अंधारात कामे करत नाही; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 11:39 PM

आम्ही शॉर्टकटवाले नाही. भाजपच्या सत्ताकाळात रात्रीचे काम झाली पण महाविकास आघाडीच्या काळात दिवसाढवळ्या होतात, असा चिमटा काढला.

मुंबई : आम्ही रात्रीच्या वा पहाटेच्या अंधारात काम करत नाही, आमच्या सरकारची कामे दिवसाची असतात, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विधानसभेत हाणला. आरे मेट्रो कारशेड हलविण्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार करून त्यांनी सत्ताधाऱ्यांनी शॉर्टकट मारला की रात्रीतून झाडे कापावी लागतात. आम्ही शॉर्टकटवाले नाही. भाजपच्या सत्ताकाळात रात्रीचे काम झाली पण महाविकास आघाडीच्या काळात दिवसाढवळ्या होतात, असा चिमटा काढला. ओरडून बोलल्याने कोरोना होतो असे हिमाचल विधानसभेच्या अध्यक्षांनी म्हटले आहे या शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले

फडणवीस यांनी कोरोना, मेट्रो कारशेड, शेतकरी कर्जमाफी आदी मुद्यांवरून सरकारवर चौफेर टीका होती. मुख्यमंत्र्यांची त्याची उत्तरे दिली. तसेच कोरोनासंदर्भात राबविण्यात येणाºया माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाची माहितीही दिली. रात्री, पहाटेची कामे आम्ही करत नाही, असे म्हणताना मुख्यमंत्र्यांनी बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सूचक बघितले.

फडणवीस-अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा थेट उल्लेख न करता त्यांनी चिमटा काढला. काम करताना इगो नसावा असे फडणवीस यांनी भाषणात म्हटले होते. त्यावर, काम करताना शॉर्टकटही नको, असे मुख्यमंत्री म्हणाले. आरे कारशेडसाठी रात्रीतून झाडे कापण्यात आल्याचा संदर्भ त्या मागे होता.

आरेमध्ये कारशेड होणार नाही

आरे कार शेडच्या बाबतीत तज्ज्ञांना सोबत घेऊन काम करतो आहोत. जो खर्च झाला आहे, तो वाया जाऊ नये याचा विचार करून पावले टाकत आहोत. आरेमधील सहाशे एकर जमीन आपण जंगलासाठी राखीव ठेवत आहोत. संपूर्ण जगात कुठेही नाही, असे हे महानगराच्या मध्यभागी असलले जंगल असेल. याठिकाणी वन्यजीव देखील असतील. देशातील कुठल्याही राष्ट्रीय उद्यानात वन्यजीव नाहीत. मुंबईसाठी इतर सोयी सुविधा देत असताना, मुंबईच्या पर्यावरणासाठी सहजीवनासाठी ही संपदा जोपासणे आवश्यक आहे.

कोरोनाचा समर्थपणे मुकाबला

आपले सरकार कोरोनाचा समर्थपणे मुकाबला करीत असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, अर्थचक्राला गती दिली जात आहे. २९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. कोरोनामध्ये आतातरी आपल्या हातामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हेच हातात आहे. सगळ्या गोष्टी कायद्याने करता येत नाही. जनतेला त्यांचे हित कशात आहे, हे नीटपणे सांगू शकलो, असे ते म्हणाले. १५ सप्टेंबरपासून राज्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम ही मोहीम सुरू होईल. घरोघरी आरोग्य चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार