नवी दिल्ली: अखिल भारतीय किसान सभेच्या मुंबईत दाखल झालेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या पक्षाची बाजू मांडली. शिवसेना सत्तेत वाटेकरी असली तरी अधिकार आणि निर्णयाची सर्व खाती भाजपाकडे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून कोणीही आमच्याकडे बोट दाखवू शकत नाही. आम्ही सत्तेत असूनही टेबल वाजवून सरकारविरोधात आवाज उठवतो, ही गोष्टी महत्त्वाची असल्याचे राऊत यांनी सांगितले. तत्पूर्वी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तील अग्रलेखातून भाजपावर जोरदार टीका करण्यात आली. शेतक-यांच्या मोर्चला पाठिंबा दर्शवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. अर्थसंकल्पात फसव्या घोषणा करून सरकारने कष्टकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळले. धुळ्याचे एक शेतकरी धर्माबाबा पाटील मुंबईच्या मंत्रालयात आले व त्यांनी आत्महत्या केली. आता ‘जय किसान’चा नारा देत हजारो जिवंत धर्मा पाटील मंत्रालयाच्या दिशेने निघाले आहेत. त्यांचा आक्रोश आणि वेदना सरकारला बेचिराख केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर आसूड ओढले.
Kisan Long March: अधिकाराची खाती भाजपाकडे; आमच्याकडे बोट दाखवण्याचा हक्क नाही- संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 1:02 PM