आम्हाला ७० आसनी शौचालय नको, आधी मूलभूत सुविधा द्या
आरेच्या रहिवाशांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आम्हाला ७० आसनी शौचालय नको, आधी मूलभूत सुविधा द्या, अशी आरेच्या रहिवाशांची मागणी आहे. या मागणीचे पत्र आरे संयुक्त युवा मंडळाने वाॅर्ड क्र. ५२ च्या भाजप नगरसेविका प्रीती सातम यांना तसेच पत्राची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे.
नगरसेविका प्रीती सातम यांनी आरेमधील रहिवाशांसाठी युनिट क्रमांक ३१ येथे ७० आसनी शाैचालय बांधण्याची घोषणा केली आहे, तर तेथील स्थानिकांनी याला विरोध दर्शविला आहे. एक संयुक्त निवेदन या मंडळाने तयार केले असून पी. दक्षिण वॉर्ड ऑफिसर संतोषकुमार धोंडे यांनाही निवेदनाची प्रत त्यांनी दिली.
आरे कॉलनी येथील मूळ समस्या शौचालय नसून येथे रस्ते, पाणी आणि सांडपाण्याच्या समस्यांमुळे येथील नागरिक त्रस्त आहेत. यासाठी लागणारा निधी हा ७० आसनी शौचालयासाठी खर्च न करता मूलभूत समस्या पुरवण्यावर खर्च करावा, अशी आग्रही मागणी मंडळाने केली आहे.
* सार्वजनिक शौचालय न बांधता घराघरात शौचालय
मोहिमेची सुरुवात करून मुख्य जोडणी काम हाती घ्यावे, सांडपाणी व्यवस्था विल्हेवाट करणारी जोडणीची कामे हाती घ्यावीत, छोटा काश्मीर गार्डनपासून माळीनगर रस्त्याचे काम पूर्ण करावे, लहान मुलांना खेळण्यासाठी मैदानाचे डागडुजीकरण करावे, अशा मागण्या सदर मंडळाने महापालिका आयुक्तांनाकडेही केल्या आहेत.
-----------------------------------------------