मुलांचे संरक्षण करण्यात आम्ही अपयशी ठरलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 02:22 AM2019-11-08T02:22:25+5:302019-11-08T02:22:29+5:30
न्या़ सत्यरंजन धर्माधिकारी : बाल तस्करी रोखण्यासाठी उपक्रम
मुंबई : एक समाज म्हणून आम्ही आमच्या मुलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलो आहोत. म्हणूनच आता मुलांना सर्व प्रकारच्या शोषणापासून मुक्त करण्यासाठी आपण एक पाऊल पुढे टाकले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्या़ सत्यरंजन धर्माधिकारी यांनी केले. बचपन बचाओ आंदोलन, महाराष्ट्र विधिक सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र श्रम विभाग, कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन फाउंडेशन आणि कॅपजेमिनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बाल तस्करी’ रोखण्यासाठी ‘मुक्ती कारवा’ सुरू करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास गेट वे आॅफ इंडिया येथून या अभियानाला हिरवा झेंडा दाखविला. याप्रसंगी न्या़ धर्माधिकारी आणि महाराष्ट्र विधिक सेवा प्राधिकरण (मुंबई)चे सदस्य सचिव श्रीकांत कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
जेव्हा सर्व मुलांचे हक्क सुरक्षित असतात आणि आपल्याला या गोष्टीची दखल घेण्याची गरज असते, तेव्हाच नवीन भारताची निर्मिती आणि विकास शक्य आहे. मुंबईतून सुरू केलेली चळवळ मुलांच्या सर्व हक्कांपासून संरक्षण करण्यासाठी प्रेरणा म्हणून काम करेल. आपल्या देशात न्यायाची समृद्ध परंपरा आहे, जी सर्वांना माहीत असावी. सर्वोच्च न्यायालयीन पदावर बसणाऱ्या व्यक्तीकडे मुलांसारखा निष्पापपणा आणि निर्भयपणा असावा. मुलांबरोबर वागताना पोलिसांनी आई-वडिलांप्रमाणे वागले पाहिजे, असेही धर्माधिकारी यांनी सांगितले.
बचपन बचाव आंदोलनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर माथूर यांनी सांगितले की, कामधंद्यासाठी लहान मुलांना पाठविण्याआधी त्यांना चांगले शिक्षण द्या. मग हीच मुले दुप्पट पगाराची नोकरी मिळवून जास्त पैसे कमवू शकतील. देशात बेरोजगारांची संख्या प्रचंड आहे. बालमजुरांच्या ऐवजी तरुणांना रोजगार दिले, तर बालमजूर निर्माण होणार नाहीत. याकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे.
अभियान काय आहे?
मुक्ती कारवा अभियान हे मुंबईतील ५९ ठिकाणी एका महिन्यापर्यंत राबविले जाणार आहे. यात भेंडीबाजार, मशीद बंदर, हाजीअली, मदनपुरा, बीडीडी चाळ, धारावी आणि कुरार व्हिलेज या ठिकाणी फिरते वाहन जाऊन बालमजूर, लैंगिक अत्याचार आणि बाल तस्करी इत्यादी विषयांवर जनजागृती केली जाणार आहे. ४ डिसेंबर रोजी कांदिवली येथील भाजी मार्केटमध्ये या अभियानाची सांगता होईल.
अभियानाचा उद्देश काय?
मुंबई ही ‘बालमित्र’ बनावी, या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात आले आहे. अभियानांतर्गत पथनाट्य, जन-जागरण गीत, छोट्या-छोट्या बैठका आणि सभा इत्यादी घेऊन लहान मुलांवर होणाºया अत्याचारासंबंधी कशी वाचा फोडता येईल, यासाठी लोकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.
बालमजूर, लैंगिक अत्याचार आणि बाल तस्करी या विषयावर मुबंईतील विविध ठिकाणी मुक्ती कारवा अभियानाचे वाहन जाऊन तेथील नागरिकांमध्ये बालकांवरील अत्याचाराविरोधात जनजागृती करणार आहे. तसेच बालकांच्या हक्काबद्दलची जाणीव व्हावी, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
- श्रीकांत कुलकर्णी,
सदस्य सचिव,
महाराष्ट्र विधिक
सेवा प्राधिकरण (मुंबई)