"खासगी क्रमांक शेअर झाल्यामुळे आम्हाला रात्री-अपरात्रीही फोन येतात"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 07:33 AM2022-01-16T07:33:26+5:302022-01-16T07:33:51+5:30
महिला पोलिसांनी मारल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी गप्पा
मुंबई : निर्भया पथकात काम करताना आमचा खासगी क्रमांक सर्वत्र शेअर झाल्याने रात्री-अपरात्री आम्हाला फोन येतात, त्यामुळे थोडा त्रास होतो, असे महिला पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सांगितले. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने बीकेसी पोलीस ठाण्यातील हॉलमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला पोलिसांना सन्मानित करण्यात आला. त्यावेळी त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न सुळे यांनी केला.
सुळे यांच्याशी गप्पा मारताना महिला पोलिसाने त्यांना दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांचे निर्भया पथक स्थापन झाल्यापासून दररोज वस्त्यांमध्ये बैठका होतात. लहान मुली व महिलांच्या अडचणी, त्यांच्याबाबतचे गुन्हे, कायदा याबाबत सतत मार्गदर्शन पथक करते. या कामात आम्ही आमचे खासगी क्रमांक सर्वत्र दिले आहेत. आमच्या ड्युटीबाबत कल्पना नसल्याने रात्री अपरात्री आम्हाला कधीही फोन येतो, त्यामुळे थोडा त्रास होतो असे महिला पोलिसांनी नमूद केले. त्यावर तुमच्या क्रमांकाचा कधी गैरवापर झाला का? असे सुळे यांनी विचारल्यावर नाही असे उत्तर महिला पोलिसांनी दिले.
रस्त्यावर तासन्तास कार्यरत महिला पोलिसांनी आरोग्याची काळजी घ्यावी व त्यांच्यासाठी स्वच्छ अशा स्वच्छतागृहाची सोय असावी याकडे सुळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी वाकोला पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनयना नटे, एटीएस आणि सायबरसारखे विभाग सांभाळणाऱ्या सहायक पोलीस आयुक्त कल्पना गाडेकर, सहायक पोलीस निरीक्षक प्रतिभा पाटील, खेरवाडी पोलीस ठाण्याच्या कॉन्स्टेबल रेश्मा जाधव अशा सहा महिलांना हिवाळी जॅकेट देत सुळे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. अप्पर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) संदीप कर्णिक, परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी आणि या विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.
रस्त्यावर ‘त्या’ टायगर असतात !
आमच्या महिला अधिकारी असो वा कर्मचारी, त्या इथे शांत दिसत असल्या तरी जेव्हा त्या कर्तव्य निभावण्यास रस्त्यावर उतरतात तेव्हा त्या एका वाघिणीप्रमाणे असतात या शब्दात संदीप कर्णिक यांनी महिला पोलिसांचे कौतुक केले.