मुंबई : मुंबईची शान असलेली बेस्टची डबलडेकर शुक्रवारी इतिहासजमा झाली. अंधेरी आगारातून निघालेली ४१५ क्रमांकाची डबलडेकर बस आगरकर चौक ते सिप्स मार्गावर धावली. डबलडेकर बसमधून शेवटच्या दिवशी प्रवास करणारे अनेक प्रवासी भावुक झाले होते. या बसला पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. ही बस पुन्हा दिसणार नसल्याची खंत प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आली.
चालक-वाहकांचा सत्कारअंधेरी पूर्व बसस्थानकात सजविलेली बस संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास आणली. बसला कुतूहलाने लोक पहात होते. बसला फुलांनी सजविण्यात आले होते. आपली बेस्ट आपल्यासाठी या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने बसचा निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बसचालक आणि वाहकाचा सत्कार केला. तसेच बसला निरोप देण्यासाठी केक कापण्यात आला. या बसची शेवटची फेरी महत्त्वाची होती. बसमध्ये तुडुंब प्रवासी भरून अखेरची फेरी करण्यात आली.
बेस्टकडून कुठलाच समारंभ नाही मुंबईच्या रस्त्यांवर गेल्या ८६ वर्षांपासून दिमाखात धावणारी तसेच मुंबईची शान असलेली बेस्टची दुमजली बस म्हणजेच डबलडेकर बसगाडी मुंबईतील शेवटची फेरी ठरली. मध्यरात्रीपासून शेवटच्या फेरीनंतर बस इतिहासजमा झाली आहे. मुंबईकरांच्या कायम स्मरणात राहणारी ही घटना होती. ही दुमजली बस इतिहास झाली. या बसला निरोप देण्यासाठी आपली बेस्ट आपल्याचसाठी संघटनेने पुढाकार घेतला होता. एवढी मोठी घटना असूनही बेस्ट प्रशासनाने कोणताही समारंभ केला नाही.