स्वस्तातल्या घरासाठी गमवावी लागली जमापुंजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:06 AM2021-07-30T04:06:33+5:302021-07-30T04:06:33+5:30
मुंबई : सरकारी प्रकल्पात स्वस्तात घर मिळवून देण्याच्या नावाखाली रिक्षाचालकासह चौघांची ८ लाख १० हजार रुपयांना फसवणूक झाली आहे. ...
मुंबई : सरकारी प्रकल्पात स्वस्तात घर मिळवून देण्याच्या नावाखाली रिक्षाचालकासह चौघांची ८ लाख १० हजार रुपयांना फसवणूक झाली आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घाटकोपर पश्चिमेकडील गावदेवीरोड परिसरात राहण्यास असलेल्या रिक्षा चालकाची यात फसवणूक झाली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते नवीन घराच्या शोधात असताना मित्र मिथिलेश चौधरीने त्यांची भेट घेतली. जुगदुशानगर येथील सरकारी जागेमध्ये सात माळ्याची इमारत बांधण्यात येणार असून, या इमारतीमध्ये ३०० चौरस फुटांचा फ्लॅट २५ लाख रुपयांत मिळवून देतो, असे चौधरी याने त्यांना सांगितले. तक्रारदार यांचा विश्वास बसावा म्हणून या जागेवर इमारत उभारणाऱ्या अधिकाऱ्यांशी आपली चांगली ओळख आहे. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन तक्रारदार यांनी त्याला एप्रिल २०१९ मध्ये एकूण ३ लाख ७० हजार रुपये पोच केले. त्यानंतर चौधरी याने आणखी दोन लाख रुपयांची पांडे यांच्याकडे मागणी केली. चौधरी याने घेतलेल्या पैशांची आणि घराबाबत काहीच कागदपत्रे दिली नसल्याने तक्रारदार यांनी त्याला विचारणा केली.
पुढे त्याने कॉल घेणे बंद केले. स्थानिकांकडे केलेल्या चौकशीत त्याने आणखीन तिघांकडून पैसे उकळल्याचे समजले. त्यानुसार, यात एकूण ८ लाख १० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलीस अधिक तपास करत आहेत.