मुंबई - निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरतं गोठल्याने दोन्ही गटांत सामना रंगला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. शिंदे गटाच्या महिला प्रवक्त्या शितल म्हात्रे याही ट्विटवरुन भूमिका मांडताना ठाकरें गटाला लक्ष्य करत आहेत. मात्र, आपली भूमिका मांडताना त्यांनी ट्विटरवरील कमेंट सेक्शन बंद केला आहे. त्यामुळे, केवळ त्यांनी मेन्शन केलेल्याच व्यक्ती त्यांच्या ट्विटरवर कमेंट करु शकतात. पण, त्यांच्याकडून सातत्याने शिवसेना ठाकरे गटाला लक्ष्य केलं जात आहे. आयोगाकडून नाव निश्चिच झाल्यानंतरही त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
शिवतीर्थावरील ठाकरेंच्या मेळाव्यात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मैदान गाजवले. त्यानंतर, शिंदे गटाकडून शितल म्हात्रे यांनी सुषमा अंधारेंवर पलटवार केला. तसेच, शिवसेनेकडून होणाऱ्या टिकेला शिंदे गटाच्या प्रवक्त्त्या बनून शितल म्हात्रे प्रत्युत्तर देत आहेत. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतरही त्यांनी ट्विट करुन भूमिका मांडली होती. आता, शिवसेना आणि शिंदे गटाला दिलेल्या नावारुन त्यांनी शिवसेनेवर टिका केली आहे. तसेच, धनुष्यबाण हे चिन्ह भविष्यात आम्हालाच मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, बाळासाहेबांची शिवसेना हे नाव शिंदे गटाला मिळाले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव उद्धव ठाकरे गटाला मिळाले आहे. त्यावरुन, म्हात्रे यांनी शिवसेनेवर व्हिडिओच्या माध्यमातून टिका केली आहे.
शिवसैनिकांच्या मनातील नाव बाळासाहेबांची शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मिळालं असून ही आमच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. आमच्या नावामध्ये प्रथम बाळासाहेब नंतर पक्षाचं नाव आहे. बाकीच्यांना जे मिळालंय त्यात प्रथम मी नंतर बाळासाहेब.. लोकांना याचा अर्थ कळत असेल. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आम्ही आमचं चिन्ह आयोगाकडे देऊ. मात्र, हे चिन्ह तात्पुरतं असेल, भविष्यात धनुष्यबाण हेच चिन्ह आम्हाला मेरीटवर मिळेल, असा विश्वासही शितल म्हात्रे यांनी व्यक्त केला.
विचार गोठले म्हणून चिन्ह गोठले
''हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारापासून शिल्लकसेना दूर गेली आहे. म्हणूनच पक्षाचे नाव आणि चिन्ह तुमच्यापासून दूर गेले असावे .... विचार गोठले आहेत, म्हणूनच कदाचित चिन्ह देखील गोठले असावे, अशा शब्दात शितल म्हात्रे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. तत्पूर्वी, बाळासाहेबांच्या विचारांचे धनुष्य आणि दिघे साहेबांच्या कृतीचा बाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडेच आहे, हे शिवसैनिक जाणतो. म्हणूनच तो आज ठामपणे शिंदे साहेबांच्या पाठीशी उभा आहे, असेही ट्विट त्यांनी केले होते.