Join us

सावित्रीबाई फुले यांच्यापुढे नतमस्तक व्हावे लागेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी वर्षा निवासस्थानी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सावित्रीबाई फुले यांची जयंती यापुढे सावित्रीबाई फुले शिक्षण दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. या सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिनाच्याही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

स्त्रियांच्या जीवनात शिक्षणाची पहाट व्हावी, यासाठी महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी आयुष्य वेचले. त्यासाठी प्रसंगी अनेक यातना, हेटाळणी, हल्ले सहन केले. स्त्री शिक्षणातूनच कुटुंब आणि पर्यायाने समाज पुरोगामी विचारांच्या वाटेवर चालू शकतो, यावर त्यांचा विश्वास होता. आज स्त्री शिक्षणात महाराष्ट्र आघाडीवर आहे. स्त्रियांनीही अनेक क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. यासाठी आपल्याला क्रांतिज्योती थोर शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्यापुढे नतमस्तक व्हावे लागेल. सावित्रीबाई यांची जयंती यापुढे राज्यात सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्वांना शुभेच्छा देताना मनस्वी आनंद होत असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या संदेशात म्हटले.

तर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेला सत्यशोधक विचार आणि रचलेल्या स्त्री शिक्षणाच्या पायावरच आजचा प्रगत, पुरोगामी, समर्थ भारत उभा आहे. देशातील स्त्रीशक्ती आज सर्व क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून योगदान देत आहे. स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहे, याचे श्रेय क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी त्याकाळात स्त्री शिक्षणासाठी घेतलेले कष्ट व सहन केलेल्या हालअपेष्टांना आहे. देश व देशातील स्त्रीशक्ती क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल कृतज्ञ आहे”, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली.