Join us

'आम्ही देवाला अटक करायला आलोय', सदावर्तेंनी सांगितल्या तुरुंगातील आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 2:01 PM

मी कष्टकऱ्यांचा वकील आहे, लोकांनी मला तळहातावर घेतलं. माझ्या तब्येतीची काळजीसुद्धा तुरुंगातील डॉक्टर असतील किंवा अधिकाऱ्यांनीही मला तळहातावरल्यासारखं जपलं.

मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांची अखेर १८ दिवसांनी तुरुंगातून सुटका झाली आहे. तुरुंगातून सुटका होताच त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात दंड थोपटले आहेत. तसेच 'हम है हिंदुस्थानी' असं म्हणत ही आपली ताकद असल्याचं म्हटलं. एकीकडे खासदार ननवीत राणांनी पोलिसाच्या वागणुकीवरुन गंभीर आरोप केले आहेत. दुसरीकडे गुणरत्न सदावर्तेंनीपोलिसांनी अतिशय चांगली वागणूक दिल्याचं म्हटलं. तसेच, पोलिसांचे आभारही मानले. 

मी कष्टकऱ्यांचा वकील आहे, लोकांनी मला तळहातावर घेतलं. माझ्या तब्येतीची काळजीसुद्धा तुरुंगातील डॉक्टर असतील किंवा अधिकाऱ्यांनीही मला तळहातावरल्यासारखं जपलं. कोल्हापूरचं लॉकअप असेल, साताऱ्याचं असेल, सगळीकडे मला अटक करुन नेतानासुद्धा मंदिरातील देवासारखं त्यांनी म्हटलं. आम्ही देवाला अटक करायला आलोय, असं अधिकारी म्हणाल्याची आठवण गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितली. यावेळी, मी अधिकाऱ्यांचं नाव घेऊन त्यांना उघडं पाडणार नाही, असेही ते म्हणाले. 

पोलीस अधिकाऱ्यांना मला मान दिला, माझा सन्मान केला. त्यामुळे, मी कृतज्ञ आहे, तुरुंगातील डॉक्टर, अधिकारी, महाराष्ट्रातील शेवटचे अधिकारी असतील, तिथपर्यंत सर्वांनी मला मान दिला. हे मान देणं त्यांच्या कार्यात कसूर केल्यासारखं नसतंय. पण, मी कष्टकऱ्यांचा वकील होतो, असे म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी सर्वांचे आभार मानले. महाराष्ट्राचेही आभार मानले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना गुणरत्न सदावर्तेंनी या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, यावेळी सदावर्ते यांची पत्नी आणि मुलगी त्यांना घेण्यासाठी ऑर्थर रोड जेलबाहेर आले होते.

सदावर्तेंचा कैदी नंबर ५६८१

भारताच्या संविधानापेक्षा मोठा कोणी नाही. यापुढे आमचा केंद्रबिंदू असेल भ्रष्टाचार. या महाराष्ट्राला सुजलाम-सुफलाम करण्यासाठी जे जे करता येईल ते आम्ही करू, असं सदावर्ते म्हणाले. कष्टकरी चळवळीला मोडीत काढण्याचा प्रयत्न करू नका, असे गुन्हे दाखल केल्यानंतर शिखर निघत नसतं हे लक्षात राहू द्या, असं मी महाराष्ट्र सरकारला आदरपूर्वक सांगतो, असं सदावर्तेंनी सांगितले. माझा कैदीनंबर ५६८१ होता. कष्टकऱ्यांसाठी लढणारा मी कैदी आहे, असं सदावर्ते म्हणाले. तसेच सरकारला जे काय करायचं ते करू द्या आपण आपलं तत्व सोडायचं नाही असं मी ठरवलं होतं. जेलमध्ये गेल्यापासून आजपर्यंत मी फक्त पाणी प्राशण केलं आहे, असे सदावर्ते यांनी सांगितले. 

कामगारांना मीच सांगितलं, कामावर जा...

दरम्यान, एसटी महामंडळातील कष्टकरी जे कामावर गेलेत ते काही कोणाच्या सांगण्यावरून गेले नाहीत. मी स्वत: जेलमधून सांगितलं होतं, तूर्त कष्टकरी कर्मचाऱ्यांनी कामावर जावं. कारण माझे कष्टकरी ६ महिने दुखवट्यात होते. मी त्यांचं कोणतंही नुकसान होऊ दिलं नाही, असंही सदावर्ते यांनी सांगितलं. 

टॅग्स :एसटी संपपोलिसगुणरत्न सदावर्ते