मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेहमीच वेगळ्या मुद्द्यांना हात घालत असतात. राज्यात असो किंवा देशात असो ते आपलं मत मांडताना मूळ समस्यांकडे लक्ष वेधतात. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या बदललेल्या राजकीय भूमिकांवरुन जोरदार चर्चा झाली. तसेच, त्यांनी हाती घेतलेल्या भोंगा आंदोलनावरुनही त्यांच्याबद्दल समाजात दोन प्रवाह तयार झाले होते. राज ठाकरेंनीमनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात माहिममधील दर्गा अतिक्रमणावर प्रकाश टाकला होता. त्यानंतर, प्रशासनाने ते अतिक्रमण तात्काळ हटवले. आता, राज ठाकरेंनी मुंबईतील आणखी एक महत्त्वाचा आणि तितकाच गंभीर विषय घेऊन व्हिडिओ शेअर केला आहे.
मुंबईत गेल्या काहि महिन्यांपूर्वी बिबट्या लोकांच्या घरात शिरल्याची बातमी माध्यमांत झळकली होती. विशेष म्हणजे एका आमदारांनी तो विषय थेट विधानसभेतही मांडला होता. मात्र, आता यासंदर्भात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी वेगळं मत मांडलं आहे. बिबट्या आपल्या घरात शिरला नाही, तर आपण बिबट्याच्या घरात शिरलोय, असे म्हणत राज ठाकरेंनी एक केस स्टडी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली आहे.
राज ठाकरेंनी मुंबईतील जंगलात होत असलेलं अतिक्रमण आणि या अतिक्रमणामुळे वाढत असलेली सिमेंटची जंगले, याकडे लक्ष वेधलं आहे. राज ठाकरेंनी मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यामध्ये, न्यूयॉर्कमधील भव्य विस्तीर्ण अशा सेंट्रल पार्क या निसर्गरम्य जागेचं वर्णन करत संपूर्ण जंगल दाखवून दिलंय. मात्र, या सेंट्रल पार्कची तुलना करताना मुंबईतील बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासोबत केली आहे.
दरम्यान, व्हिजनरी राज ठाकरे या हॅशटॅगने मनसेकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यासोबत मनसेकडून आणखी व्हिडिओ तयार करण्यात येत असल्याचे दिसून येते.