Join us

'फॅसिजम'शी लढावंच लागेल, जितेंद्र आव्हाडांकडून कालीचरणविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 6:13 PM

रायपूर येथे झालेल्या धर्मसंसदेमध्ये तथाकथित संत कालिचरण याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टीका करून नथुराम गोडसे  याचे उदात्तीकरण केले होते.

ठळक मुद्देरायपूर येथे झालेल्या धर्मसंसदेमध्ये तथाकथित संत कालिचरण याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टीका करून नथुराम गोडसे  याचे उदात्तीकरण केले होते

ठाणे (प्रतिनिधी) - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी  करणारा तथाकथित संत कालिचरण याच्यावर गृहनिर्माण मंत्री ना. डॉ.  जितेंद्र आव्हाड यांच्या फिर्यादीवरून नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फॅसिजम विरुद्ध मैदानात उतरून लढावच लागेल. गोडसेच्या पाठीराख्यांना कायद्याच्या तरतुदीनुसार अद्दल घडवावी लागेल. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक न ठेवता मी स्वतः कालीचरण बाबा विरुद्ध नौपाडा पोलीस स्टेशन ठाणे येथे गुन्हा नोंदवत असल्याचं ट्विट आव्हाड यांनी केलं होतं. त्यानंतर, त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

रायपूर येथे झालेल्या धर्मसंसदेमध्ये तथाकथित संत कालिचरण याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टीका करून नथुराम गोडसे  याचे उदात्तीकरण केले होते. त्यामुळे सबंध देशभर संताप व्यक्त केला जात आहे. ही टीका करून कालिचरण याने सबंध देशवासियांचा अवमान केला आहे. त्याबद्दल डॉ. जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात धडक दिली. तसेच कालिचरण यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली. यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी, रायपूर येथे महात्मा गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधाने कालिचरण बाबा याने केली आहेत. ही विधाने करीत असताना त्याने नथुराम गोडसेचे समर्थन करताना आपल्या विधानाचेही समर्थन करताना आपल्या वाटेत येणाऱ्या लोकांना कापून टाकण्याची धमकी दिली आहे. या आधीही कालिचरण बाबाने धार्मिक द्वेष पसरवणारी भाषणे केली आहेत. त्यामुळेच आपण नौपाडा पोलीस ठाण्यात  जाऊन कालिचरण बाबांबरोबर भादंवि  294, 295(अ), 298, 505(2), 506, आणि 34 ( 34) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. फॅसिझमच्या विरुद्ध मैदानात उतरून लढावच लागेल. गोडसेच्या पाठीराख्यांना कायद्याच्या तरतुदीनुसार अद्दल घडवावी लागेल. त्यामुळेच आपण स्वतः दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक न ठेवता कालीचरण बाबा विरुद्ध नौपाडा पोलीस स्टेशन ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे. ही विचारांची लढाई आहे आणि आपण ही लढाई लढणार आहोत, असे सांगितले.

टॅग्स :जितेंद्र आव्हाडमुंबईगुन्हेगारीमहात्मा गांधी