"आम्ही मंडप हटवलेला नाही"; जरांगे पाटलांची स्पष्ट भूमिका, सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 02:17 PM2023-10-11T14:17:02+5:302023-10-11T14:17:27+5:30

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारने मागणी केल्यानुसार ३० दिवसांचा आणि त्यावर वाढीव १० दिवसांचा वेळ दिला होता

"We have not removed the pavilion"; Manoj Jarange Patil gave a clear stand | "आम्ही मंडप हटवलेला नाही"; जरांगे पाटलांची स्पष्ट भूमिका, सरकारला इशारा

"आम्ही मंडप हटवलेला नाही"; जरांगे पाटलांची स्पष्ट भूमिका, सरकारला इशारा

मुंबई - अंतरवाली सराटी गावातील मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या १४ ऑक्टोबर रोजीच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज एकत्रित येणार आहे. या सभेच्या माध्यमातून सरकारला ताकद दाखवण्याचं काम आणि आरक्षणाची मागणी आणखी तीव्र करण्याचं काम होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गेल्या १० दिवसांपासूनच्या माझ्या सभांना मोठी गर्दी होत आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सर्वचजण सभेसाठी अर्ध्यारात्री, पहाटेपर्यंत जागत आहेत. कारण, ही त्यांची वेदना आहे, असे पाटील यांनी म्हटले.  

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारने मागणी केल्यानुसार ३० दिवसांचा आणि त्यावर वाढीव १० दिवसांचा वेळ दिला होता. त्यानुसार, १४ ऑक्टोबर रोजी १ महिना पूर्ण होत आहे. त्यामुळेच, छत्रपती संभाजीनगरमध्ये विराट सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेनंतर १० दिवसांचा अवधी राज्य सरकारकडे असणार आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे पाटील यांची आहे. त्यामुळे, आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराच पाटील यांनी दिला. तसेच, हे सरकार आम्हाला आरक्षण देईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये ती धमक आहे, असेही पाटील यांनी म्हटले. तसेच, जर आरक्षण मिळाले नाही, तर आम्ही अद्याप मंडप हटवला नाही. त्यामुळे, आरक्षण मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहिल, अशी स्पष्ट भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली आहे.  

साडे तीन कोटी कुणबी मराठा हे ओबीसी

राज्यातील पाच कोटी मराठे ओबीसीमध्ये आले तर आमचे आरक्षण कमी होईल, अशी भीती ओबीसी समाजाला दाखविण्यात येत आहे. पाच कोटी मराठ्यांपैकी विदर्भ, खान्देश, कोकणपट्टा, शेवगावपासून ते पाथर्डीपर्यंतचा सुमारे साडेतीन कोटी मराठा समाज कुणबी म्हणून ओबीसीमध्ये आहेच. उर्वरित महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मराठ्यांनी तुमचे काय घोडे मारले, असा सवाल करीत मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आहोत, फक्त मराठा समाजाने एकजुटीने राहावे, असे आवाहन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले.

आमच्यात फूट पडणार नाही

मराठा समाज एकवटला आणि सरकारने आरक्षण देण्याची तयारी दाखवित आपल्याला एक महिन्याची मुदत मागितली. आपणही मराठा समाजबांधवांशी सल्लामसलत करून ४० दिवसांची मुदत दिली. ही मुदत २४ ऑक्टोबरला संपत आहे. तत्पूर्वी आपल्याला १४ ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी येथे सभा घेऊन सरकारला ताकद दाखवण्यात येईल,असे जरांगे पाटील यांनी म्हटले. तसेच, मराठा समाजासाठी, त्यांच्या भावी पिढ्यांसाठी हा लढा सुरू आहे. मी समाजाशी गद्दारी करणार नाही. म्हणूनच आमच्यात फूट पडणार नाही. राज्य नाही किंवा देश नाही, कुठलीही शक्ती आमच्यात फूट पाडू शकणार नाही. मी मराठा समाजाला शब्द दिलाय, आरक्षण घेतल्याशिवाय हे आंदोलन संपणार नाही. आरक्षण घेणार आणि समाजाला न्याय मिळवून देणार, असेही पाटील यांनी म्हटले. 
 

Web Title: "We have not removed the pavilion"; Manoj Jarange Patil gave a clear stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.