मुंबई: भाजपाकडून वारंवार राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार त्यांच्यातील अंतर्गत वादामुळे कोसळणार असल्याचा दावा केला जात आहे. भाजपाच्या या दाव्यावर महाविकास आघाडीकडूनही राज्यात स्थापन झालेल्या सरकारला कुठलाही धोका नसून, सरकार पडणार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात येत आहे. याचदरम्यान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री अजित पवार यांनी देखील भाजपाच्या सरकार पडण्याच्या दाव्यावर निशाणा साधला आहे.
विरोधी पक्षला सतत बोलावं लागतं. महाविकास आघाडीच्या सरकारला पडणार नाही. तसेच सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. आमदार आणि कार्यकत्यांमध्ये चलबिचल होते, म्हणून कार्यकर्ते जपण्यासाठी गाजर दाखवावं लागतं. त्यामुळे विरोधक सरकार पडणार असं बोलत असल्याचा टोला अजित पवार यांनी भाजपाला लगावला आहे. आज, कराड येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अजित पवार यांनी प्रीतिसंगम याठिकाणी त्यांच्या समाधी स्थळावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
तत्पूर्वी, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीन पक्षांची अनैसर्गिक आघाडी असणारे सरकार टिकणार नाही. ज्या दिवशी हे सरकार जाईल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, असं विधान केले होते. देवेंद्र फडणवीसांच्या या विधानावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली होती. सत्ता गेल्यानंतर त्रास होतो मी समजू शकतो. त्या त्रासाच्यापोटी, उद्वेगापोटी अशाप्रकारचे शब्द जनरली न वापरणारेही वापरायला लागतात त्यामुळे ते गांभीर्याने घेऊ नये. त्यांची सत्ता गेली याची ही अस्वस्थता आहे. माणसाने आशा ठेवावी, असा टोला शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला होता.
देवेंद्र फडणवीसांनी मागेही मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन असे सांगितले होते आणि काल परवा असंच काहीसं सांगितले आहे. ठीक आहे त्यांच्याकडे बारकाईने लोक लक्ष देतात. अशीच भावना त्यांची असेल तर आपण खबरदारी घेतली पाहिजे. ते लोकांच्या अधिक लक्षात येईल, असं शरद पवार यांनी सांगितले. तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मिळणारा सर्वसामान्यांचा पाठिंबा पाहून काही लोकांना नैराश्य आलं आहे. या नैराश्येतूनच हे सर्वकाही होत आहे. आपल्याला सत्ता मिळणार नाही, यासंबंधीची अस्वस्थता आणि संताप आहे तो या माध्यमातून व्यक्त केला जात आहे, अशी टीकाही शरद पवार यांनी भाजपावर केली आहे.