आम्हाला हवा कोंडीमुक्त प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 03:20 AM2018-04-19T03:20:50+5:302018-04-19T03:20:50+5:30

शहरात सध्या सुरू असलेल्या विकासकामांमुळे वाहतूककोंडी होत असली तरी वाहतूक पोलिसांचा गलथान कारभारदेखील दुर्लक्षित करून चालणार नाही.

We have to stay in the air mound-free journey | आम्हाला हवा कोंडीमुक्त प्रवास

आम्हाला हवा कोंडीमुक्त प्रवास

googlenewsNext

स्वच्छ हवा, निर्मळ पाणी यांसह कोंडीमुक्त वाहतूक हीदेखील नागरिकांची अपेक्षा आहे. प्रशासनाकडून उपाय राबविले जात असल्याचे सतत ऐकिवात असते. मात्र वाहतूककोंडी जैसे थे असल्याचे प्रत्यक्ष परिस्थितीवरून दिसून येते. शहरात सध्या सुरू असलेल्या विकासकामांमुळे वाहतूककोंडी होत असली तरी वाहतूक पोलिसांचा गलथान कारभारदेखील दुर्लक्षित करून चालणार नाही. अशीच प्रतिक्रिया सर्वसामान्यांची आहे. वाहतूककोंडीमुक्त शहरासाठी मागविण्यात आलेल्या प्रतिक्रियांमधील निवडक प्रतिक्रिया प्रातिनिधिक स्वरूपात देत आहोत. किमान सूचनेनुसार जरी काम झाल्यास ‘वाहतूककोंडीमुक्त शहर’ ही संकल्पना साकारण्यास मदत होईल...

नो हॉकिंग मोहिमेचा बट्ट्याबोळ
जुहू येथील ए.बी. नायर रोडवर वाहने उभी करण्यास मनाई आहे. मात्र तरीदेखील या रस्त्यावर सर्रास अनधिकृतपणे वाहने उभी केली जातात. यामुळे वाहतूककोंडी होते. कोंडीतून मुक्तता मिळविण्यासाठी कर्णकर्कश हॉर्न वाजवले जातात. सरकारतर्फे ‘नो हॉकिंग मोहीम’ राबविण्यात येत आहे. मात्र येथे या मोहिमेचा बट्ट्याबोळ झाल्याचे दिसते. याबाबत अनेक वेळा तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही. बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी रात्री येथे हॉटेलमध्येदेखील मोठ्या आवाजात संगीत सुरू असते. जुहू येथील ए.बी. नायर रोडवरील रहिवाशांना कोंडीच्या जाचातून मुक्ती मिळणार तरी कधी?
- नौशिन नादियाडवाला, जुहू

बोरीवली पूर्व नॅशनल पार्क येथून स्टेशनकडे रिक्षा, बस किंवा बाइकने जायचे झाल्यास अर्धा-पाऊण तास मोडतो. तसा हा रस्ता अवघा १० मिनिटांचा; परंतु अनधिकृतरीत्या थाटण्यात आलेल्या दुकानांमुळे रस्ता झाकून गेला आहे. त्यात भर पडते ती बाइक पार्किंगची. या संपूर्ण रस्त्यावर दुतर्फा बाइक पार्किंग केली जाते. त्यामुळे फक्त एकच रांग गाड्यांची ये-जा करण्यासाठी उरते. पालिका प्रशासनाने जर मनावर घेतले आणि ही बेकायदेशीर अतिक्रमणे काढून टाकली; तसेच बाइक पार्किंगवर निर्बंध घातले, तर सर्वसामान्य बोरीवलीकर मोकळा श्वास घेऊ शकतील.
- पांडुरंग शेलार, बोरीवली

अंधेरी हे पश्चिम उपनगरातील गर्दीचे ठिकाण. मात्र, येथे पब्लिक ट्रान्सपोर्टचा पुरता बोजवारा उडालेला दिसतो. अंधेरी स्थानक परिसरात बेस्ट बसला पोहोचायचे झाल्यास मोठ्या ट्राफीकचा सामना करावा लागतो. याचा नाहक त्रास नोकरदार वर्गाला सहन करावा लागतो. रस्ते नियोजनाचा अभाव हे येथील वाहतूककोंडीमागचे महत्त्वाचे कारण आहे. खासगी वाहनांना स्टेशन परिसरात गर्दीच्या वेळी यायला मज्जाव केल्यास येथील गुंता थोड्या प्रमाणात तरी सुटू शकेल.
- किशोर गायकवाड, अंधेरी

स्मार्ट सिटीच्या नावाखाली मुंबईकरांना वाहतूककोंडीच्या त्रासात ढकलले गेले आहे. स्मार्ट सिटी म्हणजे काय, स्मार्ट सिटी कशी असावी, यावर नगरविकासमंत्र्यांनी अभ्यास केला असेल यावर शंकाच वाटते. आज मुंबईतील नोकरदारांच्या आयुष्यातील अर्धा वेळ वाहतूककोंडीत जातो. वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी सर्वप्रथम पदपथ मोकळे करायला हवेत. रस्त्यांच्या कडेला उभी असलेली अनधिकृत बांधकामे हटवून रस्ते मोकळे करायला हवेत, तरच ‘ट्राफीकमुक्त मुंबई’चे स्वप्न साकार होईल.
- जयेश शेरेकर, घाटकोपर


सातरस्ता येथील गोल बगिचा कमी करा
मुंबई सेंट्रल (पूर्व) रेल्वे स्थानकापासून काहीशा अंतरावर सातरस्ता (गाडगे महाराज चौक) विभाग आहे. येथे निरनिराळ्या भागांतून सातरस्ते एकत्र आले आहेत. नायर रुग्णालयाकडून जाणारा मार्ग, साने गुरुजी मार्ग तसेच महालक्ष्मी स्टेशनकडून येणारा मार्ग असे मार्ग एकत्रित आल्याने येथे वाहनांची वर्दळ असते. संध्याकाळच्या वेळेत फारच वाहतूककोेंडी होते. इच्छित स्थळी वेळेवर पोहोचणे शक्य होत नाही. सातरस्त्याच्या मध्यभागी गोलाकार आकाराचा बगिचा आहे. त्या जागेत भूमिगत पाण्याच्या टाक्या आहेत असे म्हटले जाते. परंतु तो बगिचाचा आकार शक्य असेल तेवढा लहान केला तर रस्ता रुंद होईल. तसेच शक्य असेल तेथे फुटपाथ अरुंद करावेत. त्याशिवाय येथे काही क्रमांकांच्या बसेचचे तीन थांबे आहेत व काही बसेच तेथूनच सोडण्यासाठी थांबून ठेवलेल्या असतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. तेथील सर्व बस थांबे सानेगुरुजी मार्गावर किंवा पुढील रस्त्यावर हलविणे आवश्यक आहे. जेणेकरून तेथे थांबणाऱ्या प्रवाशांची गर्दी कमी होईल.
- महादेव राजाराम जाधव,
मुंबई सेंट्रल (पूर्व)

सोनापूर येथील अनधिकृत वाहनतळ हटवा
भांडुप पश्चिम येथील सोनापूर सिग्नल परिसरातील गोरेगाव मुलुंड-गोरेगाव लिंक रोडसमोर मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाहनतळावर शेकडो वाहने उभी केली जातात. यामुळे पादचाºयांना मुख्य रस्त्यांवरून चालावे लागते. हाकेच्या अंतरावर असलेल्या वाहतूक पोलिसांच्या चौकीतील वाहतूक पोलिसांकडून यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. मुलुंड-गोरेगाव लिंक रोडवरील अनधिकृत वाहनांचे वाहनतळ हटवत कोंडीमुक्त प्रवासाचे स्वप्न साकार करण्यास मदत करावी.
- गणेश वराडे, भांडुप पश्चिम

टिळक पुलावर वाहनांना मोकळा श्वास हवा
दादर येथील टिळक पुलावर भाजी विक्रेते मोठ्या प्रमाणावर असतात. विक्रेत्यांनी भर रस्त्यात बस्तान मांडल्याने साहजिकच भाजी खरेदी करण्यासाठी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. हीच गर्दी दादर टिळक पुलाच्या वाहतूककोंडीला कारणीभूत ठरत आहे. त्याचबरोबर काळी-पिवळी टॅक्सीदेखील प्रवाशांसाठी येथेच उभ्या असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी यावर योग्य ती कारवाई करणे गरजचे आहे.
- दीपा अग्रवाल, मुंबई

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ‘एक्स्प्रेस’ शब्द हटवा
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील (पश्चिम दु्रतगती महामार्ग ) जोगेश्वरी ते अंधेरीदरम्यान नेहमी वाहतूककोंडी असते. हे अंतर पार करण्यासाठी ३० मिनिटांहून जास्त वेळ लागतो. यामुळे जोगेश्वरी ते अंधेरीदरम्यान ‘वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे’ असा उल्लेख करण्याऐवजी केवळ ‘वेस्टर्न हायवे’ असा उल्लेख करणे योग्य राहील. येथील वाहतूककोंडी फोडण्यास यश येत नाही तोपर्यंत ‘एक्स्प्रेस’ हा शब्द हटवा.
- सॅव्हिओ डिलिमा, मुंबई

सिग्नलला वाहतूक पोलीस हवा
पश्चिम द्रुतगती मार्ग मेट्रो स्थानकालगत असलेल्या ग्रँड हयात सिग्नलवर अनेकदा वाहतूक पोलीस तैनात नसतात. यामुळे सिग्नल लाल असतानादेखील येथे सर्रासपणे वाहतूक सुरू असते. या सिग्नलजवळ पाच रस्ते एकत्र येतात. परिणामी, हा सिग्नल पार करण्यासाठी रोज सुमारे २० ते २५ मिनिटांचा वेळ लागतो; शिवाय वाहतूककोंडीमुळे मनस्तापही सहन करावा लागतो.
- इप्सिता त्रिपाठी, मुंबई
 

Web Title: We have to stay in the air mound-free journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.