मुंबई - उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटांचा शिवसेनेवर ताबा मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरु आहे. यातच काही काळासाठी निवडणूक आयोगाने शिंदे आणि ठाकरे गटांना त्यांच्या पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह वाटून दिले आहे. त्यानुसार सोमवारी ठाकरे गटाला मशाल दिली होती. तर शिंदे गटाकडे चिन्हाचे नवे तीन पर्याय मागितले होते. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव निश्चित झाले, तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव अंतिम करण्यात आले आहे. त्यावर, शिंदे गटाकडून समाधान व्यक्त करण्यात आले असून मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एकनाथ शिंदेंनी उठाव केला, आम्ही ४० आमदार आणि १० अपक्षांनी या उठावाला समर्थन केलं. त्यानंतर, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं, पुढे निवडणूक आयोगाकडे गेला. आता, निवडणूक आयोगाने बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आमच्या शिवसेनेला दिलंय. बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्या एकनाथ शिंदेंचं समर्थन आम्ही केलंय, असे म्हणत मंत्री उदय सामंत यांनी शिंदे गटाला मिळालेल्या नावावरुन समाधान व्यक्त केलं आहे.
निवडणूक आयोगाचा निर्णय झाला, तो आमच्यादृष्टीने अन्यायकारक होता. कारण, आमच्याकडे नंबर्स असताना, मेजोरिटी असतानाही आम्हाला धनुष्यबाण हे चिन्ह नाकारलं. पण, निवडणूक आयोगाने आमच्या शिवसेनेला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव निश्चित केले. बाळासाहेबांचा विचार पुढे नेत असताना आम्ही ह्या नावावर समाधानी आहोत. नक्कीच या संघटनेच्या मार्फत बाळासाहेबांचा विचार आणखी वृद्धींगत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा मला विश्वास आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.
शिंदे गटाला तळपता सूर्य?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाले असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्षाचे नाव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे असणार आहे. ठाकरे गटाला धगधगती मशाल हे निवडणूक चिन्ह बहाल करण्यात आले होते. आज निवडणूक आयोगाने शिंदे गटाला तळपत्या सुर्याचे चिन्ह देण्यात येणार असल्याचे सुत्रांनी एबीपी माझाला सांगितले. या चिन्हाची थोड्याच वेळात घोषणा होणार असल्याचेही सांगण्य़ात आले आहे. आज सकाळी शिंदे गटाने निवडणूक आयोगाला ई-मेल द्वारे निवडणूक चिन्हाचे पर्याय पाठवले आहेत. यामध्ये तळपता सूर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचे झाड हा पर्याय पाठवला आहे.